मुंबई : बीड जिल्ह्यातील मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाचे अस्तित्व कायम राहण्यासाठी ‘ग्लॅरिसिडीया’ वनस्पती नष्ट करण्याची मागणी आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. (Mumbai)
मंत्रालय येथे आष्टी, पाटोदा आणि शिरूर (का) येथील विविध प्रश्न व मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाच्या अस्तित्वासाठी उपाययोजनाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस, मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकर, उपसचिव विवेक हौशिंग, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) एम. श्रीनिवास राव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2025/02/1000692840.jpg)
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस व त्या गावातील नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून मयूर अभयारण्य येथील ग्लॅरिसिडीया वनस्पती नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्या ठिकाणी मयूर पक्षासाठी उपयुक्त असलेले वड, पिंपळ, जांभूळ, उंबर, कडुलिंब यासारख्या पारंपरिक वृक्षांची लागवड करण्यात येईल.
मयूर अभयारण्य येथील प्राण्यांची, पक्षांची माहिती मिळावी यासाठी प्राणिसंग्रहालय उभारणे, अभयारण्यातील जखमी प्राण्यांवर उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय निर्मितीबाबत, वन्य प्राण्यापासून अभयारण्या शेजारील शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत याकामास निधी उपलब्ध करून देणे आदी मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामे मार्गी लावण्यात येतील, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. बेदरवाडी गावाचा डोंगरी विभागात समावेश करून तेथील गावठाणाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबतही विचार करण्यात येईल, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले.
(Mumbai)
वनमंत्री नाईक म्हणाले की, आष्टी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार) या तालुक्यांमध्ये वनविभागाचे मोठे क्षेत्र असून त्यामधील वन्यजीव विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग या विभागांमध्ये विकासयोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी वनविभागाच्या जमिनीचे महसूल विभागाकडे आणि महसूल विभागाची जमीन वन विभागांकडे हस्तांतरित करणे या प्रश्नांवर चर्चा आणि उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांशी चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री नाईक यांनी यावेळी सांगितले.