मुंबई : महापुरुषांविरुद्ध अवमानजनक वक्तव्य केले तर त्याचे समर्थन शासन करणार नाही. संभाजी भिडे यांच्यावर अमरावती येथे गुन्हा दाखल झालेला आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करणाऱ्या ‘शिदोरी’ या मासिकावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी ट्विट करत फडणवीसांवर पलटवार केला आहे.
डॉ.नारकर यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, गांधीहत्येच्या खटल्यातील आरोपी माफीवीर आणि महात्मा यांची तुलना हा गांधीजी आणि स्वातंत्र्य चळवळीचा अपमान आहे.
सध्या संभाजी भिडेंच्या महापुरुषांबद्दलच्या अवमानजनक वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रभर भिडेंच्या निषेध केला जात असून भिडेंच्या अटकेची मागणी केली जात आहे.
संभाजी भिडेंना ८ दिवसांत पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश
अमरावती येथे २७ जुलै रोजी येथील महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून लोकांमध्ये असंतोष पसरविण्याचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. यासाठी राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे व आयोजकांना नोटीस जारी केली आहे. संभाजी भिडे यांना ८ दिवसांत अमरावती पोलीसाकडे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.