पुणे : शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज असावा, अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे अनेकदा केली असून आजपर्यंत ध्वज लावण्यात न आल्याने शासकीय शिवजन्मोत्सवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी बहिष्कार टाकला आहे.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, शिवजयंती साजरी करणारच आहोत, पण किल्ले शिवनेरीच्या शासकीय शिवजन्मोत्सवावर बहिष्कार टाकला आहे. शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावण्याची मागणी अनेकदा राज्य आणि केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, त्यावर निर्णय न घेतल्याने आपण आता शिवनेरी गडावर जाणार असून खाली शिवप्रेमींसोबत थांबणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जे केंद्र सरकार जर 370 कलम हटविण्याची गोष्ट करते तर तेच केंद्र सरकार पुरातत्व खात्याच्या छोट्याशा नियमावलीत सुधारणा करू छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करू शकत नाही? असा सवालही खा. कोल्हे यांनी केला आहे.
खा. कोल्हे म्हणाले, शिवनेरी वर तर जाणारच. पण वर शासकीय कार्यक्रम सुरू असताना सर्वसामान्य शिवभक्तांना खाली अडवून ठेवले जाते. या शिवभक्तांसोबत मी असेल. त्या शिवभक्तांसोबत भगवा ध्वज खांद्यावर घेऊन गड चढणार असून कुठल्याच शासकीय कार्यक्रमात सहभागी होणार नाही असे त्यांनी सांगितले.