पिंपरी चिंचवड : “राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार केंद्रातील मोदी सरकारला विरोध करीत असताना मोदी सरकारची धोरणे राज्यात राबवीत आहे” असा आरोप लोकजागर ग्रुपचे प्रमुख कार्यकर्ते डॉ.सुरेश बेरी यांनी केला.
‘एसटी वाचवा संघर्ष समिती’ च्या वतीने निगडी येथे एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी 2 जानेवारी रोजी एक कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती.’ त्यामध्ये डॉ.बेरी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “केंद्र सरकारने कवडीमोल किंमतीत सार्वजनिक उद्योग विक्रीला काढले आहेत. गेल्या 70 वर्षात ज्या उद्योगांच्या उभारणीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला होता, ते आता मोदी सरकाने विकून टाकण्याचा सपाटा चालवला आहे. फायद्यातले उद्योग सुध्दा विकले जात आहेत. तेच धोरण राबवीत राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार एसटीचे खासगीकरण करण्याच्या बेतात आहे.”
“केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचे पूर्वीचे 40 कायदे रद्द करून त्याच्या जागी कामगार विरोधी आणि उद्योगपतीधार्जिणे असे 4 कायदे आणले आहेत. तेच कायदे आता राज्य सरकारने राज्यात राबवायचे ठरवले आहे. अशा प्रकारे आघाडीचा भाजपविरोध फक्त राज्यातल्या सत्तेसाठी आहे. एसटीच्या खाजगीकरणामुळे संपूर्ण राज्यातले जनजीवन विस्कळीत होणार आहे. खेडोपाड्याच्या अर्थकारणावर त्याचा परिणाम होणार आहे. पण त्याची सरकारला फिकिर नाहीये. सरकारला फक्त खाजगी कंत्राटदारांची काळजी आहे. सरकारचा हा खाजगीकरणाचा डाव एस टी कामगार आणि जनता यांनी हाणून पाडला पाहिजे.”
पर्यावरण रक्षणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे गरजेचे – डॉ. बेरी
पर्यावरणाच्या प्रश्नाचा संदर्भ घेऊन डॉ.बेरी म्हणाले, “ पर्यावरण रक्षणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट झाली पाहिजे, असे प्रयत्न जगभरात चालले आहेत. आपल्या सरकारचे पाऊल मात्र उलट्या दिशेने पडत आहे. खासगीकरणाचे सरकारचे हे धोरण पर्यावरण विनाशाला हातभार लावणारे आहे.”
यानंतर एसटी कामगारांचे प्रतिनिधी प्रवीण मोहिते म्हणाले “अशा प्रकारे प्रथमच आम्ही रस्त्यावर येऊन आमचा लढा जनतेपर्यंत घेऊन येत आहोत. आमच्या सुमारे 50 कामगारांनी या लढ्यात आतापर्यंत बलिदान दिले आहे. त्यानिमित्त आमचा गेले 56 दिवस दुखवटा चालू आहे. येथून पुढचा लढा जनतेने हातात घ्यावा. हे आंदोलन कसे चुकीचे आहे, हे आज शासन वेगवेगळ्या प्रकारे जनतेला सांगत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.”
ते पुढे म्हणाले, “एसटी कर्मचार्यांची स्थिती सध्या फार बिकट आहे. 2000 सालापासून आमचा पगार वाढलेला नाही. कर्मचार्यांचे शोषण सरकारने मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे आज त्याचा मोठा उद्रेक झाला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण झाल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही.” यानंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते वैजनाथ शिरसाठ यांनी कामगार लढ्याला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे, असे जाहीर केले.
सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डीवायएफआयचे प्रमुख कार्यकर्ते सचिन देसाई यांनी केले. याप्रसंगी डीवायएफआयचे स्वप्निल जेवळे, बाळासाहेब घस्ते, रमेश लाटकर, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सुधीर मुरूडकर, श्रीराम नलावडे, लोकजागर ग्रुपचे गोकुळ बंगाळ, संकेत भरमगुडे, एसटी कामगार योगेश शिंदे, भरत नाईक, संदीप सिरसाठ, रहमान शेख, शाम भागवत, नगरकर हे उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला व नंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.