पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीमध्ये प्रस्तावित कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीला केंद्र सरकारने परवानगी द्यावी. त्याचा पुणे जिल्ह्यासह पिंपरी – चिंचवडला फायदा होईल, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
केंद्रीय रसायन व औषधी निर्माण राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी एचए कंपनीला भेट दिली. यावेळी एचए कामगार संघटनेचे अध्यक्ष खासदार मनोज कोटक, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक निरजा सराफ आदी उपस्थित होते. त्यावेळी आमदार लांडगे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मांडवीय यांना निवेदन दिले.
कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका २५ कोटी रुपयांची आर्थिक मदत हिंदुस्थान अँटिबायोटिक (एचए) कंपनीला करणार आहे. तसेच, पिंपरी- चिंचवडसह महाराष्ट्रात लसीकरण उपलब्धते अभावी बंद करावे लागते. पुरेसा साठा नसल्यामुळे लसीकरण केंद्रासमोर रांगा दिसतात. यामुळे हिंदुस्थान अँटिबायोटिक (एचए ) कंपनीला लस निर्मितीसाठी परवानगी घ्यावी अशी मागणी आमदार लांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.