Tuesday, April 23, 2024
Homeजिल्हाबांधकाम कामगारांचे मागण्या पूर्ण करा अन्यथा मुंबईत विराट मोर्चा - डॉ. डी....

बांधकाम कामगारांचे मागण्या पूर्ण करा अन्यथा मुंबईत विराट मोर्चा – डॉ. डी. एल. कराड यांचा इशारा

मुंबई : सीटू प्रणित कंस्ट्रक्शन वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज देशातील 18 राज्यातील दहा लाख कामगारांनी दोन दिवसाच्या संपास सुरुवात केली. महाराष्ट्रातही मोठ्या शहरांमध्ये बांधकाम कामगारांनी संपाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.

संपा निमित्त बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सिटू कामगार भवनांमध्ये कामगारांचा भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बोलताना डॉ. डी. एल. कराड यांनी बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवा अन्यथा जानेवारीमध्ये बांधकाम कामगारांचा विराट मोर्चा मुंबईत मंत्रालयावर काढण्यात येईल असा इशारा दिला.

बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या राज्यातील खात्यामध्ये 43 हजार कोटी रुपये शिल्लक असून बांधकाम मजुरांची नोंदणी न केल्यामुळे व केंद्र आणि राज्य सरकारांच्या नाकर्तेपणामुळे लाखो कामगार आर्थिक लाभापासून वंचित आहेत. महाराष्ट्रातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडेही 11 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मग राज्य सरकार बांधकाम कामगारांना विविध लाभ का देत नाही असा सवाल डॉक्टर कराड यांनी केला. 

राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते त्यांनी पाळले नाही. याबद्दल डॉक्टर कराड यांनी कामगार मंत्री व महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.

सर्वोच्च न्यायालयाने मंडळाचा निधी बांधकाम कामगारांचे विकासासाठी खर्च करावा व विविध योजनांचे लाभ लागू करावेत असे निर्देश दिलेले आहेत. तरीही केंद्र सरकार आणि राज्य सरकारे बांधकाम कामगारांच्या मागण्या कडे दुर्लक्ष करीत आहेत. या पार्श्वभूमीवर हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.

मेळाव्यात बांधकाम मजुरांची नोंदणी प्रक्रिया सोपी करावी, 10 हजार रुपये बोनस द्यावा, घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे, मेडिक्लेम योजना पुन्हा सुरू करावी, शिक्षणाच्या योजनांची रक्कम दुप्पट करावे , बाळंतपणासाठी सहा महिने दरमहा तीन हजार रुपये अनुदान द्यावे. या व अन्य मागण्या करण्यात आल्या, मागणी पत्राचे वाचन सिटूचे जिल्हा चिटणीस तुकाराम सोनजे यांनी केले.

मेळाव्यास अध्यक्षस्थानी बांधकाम कामगार फेडरेशनचे राज्याध्यक्ष कॉ. सिताराम ठोंबरे होते. प्रास्ताविक बांधकाम कामगार संघटनेच्या सरचिटणीस सिंधुताई शार्दुल यांनी केले. मेळाव्यास बांधकाम व्यवसायिक अनिल दंडगव्हाळ यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले. राज्य उपाध्यक्ष कल्पना शिंदे उपस्थित होत्या. मेळाव्यास मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.

“इतरांचे बंगले व इमारती बांधणाऱ्या कामगाराला स्वतःचे घर नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी सिटू हाउसिंग सोसायटीच्या माध्यमातून 5000 बांधकाम मजुरांना स्वस्तात घरे मिळवून देण्याचा मनोदय यावेळी सिटूचे डॉ.डी.एल.कराड यांनी जाहीर केला.”

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे कामगार खात्याबरोबरच अन्य खातेही आहेत, त्यामुळे ते कामगारांच्या प्रश्नाकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत असे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील कामगारांचे प्रश्न तसेच कामगार विषयक मंडळाचे कामकाज नीटपणे होत नाही. यापूर्वी फडणवीसांच्या काळातही असेच घडले. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगार खात्यासाठी स्वतंत्र मंत्री द्यावा अशी मागणी यावेळी सीटूचे राज्याध्यक्ष डॉक्टर कराड यांनी केली.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय