Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये शुक्रवारी सकाळी 11.50 वा. सुमारास एक मोठा भूकंप झाला असून, तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 7.2 मापली गेली, तर काही अहवालांमध्ये ती 7.7 रिक्टर स्केलवर पर्यंत असल्याचे सांगितले जात आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या सागाइंग प्रांतात होता, जो जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपाचे झटके म्यानमारसह थायलंडच्या राजधानी बँकॉकपर्यंत जाणवले असून, या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा – कुणाल कामराच्या प्रकरणावर ध्रुव राठीने दिली प्रतिक्रिया, पैसेही पाठवले)
भूकंपाचा प्रभाव आणि नुकसान | Myanmar Earthquake
म्यानमारच्या मांडले शहरात इरावदी नदीवरील प्रसिद्ध ‘एवा ब्रिज’ कोसळल्याची माहिती आहे, ज्यामुळे स्थानिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. थायलंडमध्येही बँकॉकमधील अनेक गगनचुंबी इमारतींना तडे गेल्याचे आणि काही ठिकाणी इमारती झुकल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (हेही वाचा – खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ; भत्त्यासह पेन्शनही वाढली)
बँकॉकमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, विमानतळावर उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या भूकंपाचे झटके चीन आणि तैवानच्या काही भागांतही जाणवल्याचे सांगितले जात आहे.
प्राथमिक अहवालांनुसार, म्यानमारमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. थायलंडमधील बँकॉक येथील एक टॉवर कोसळल्याने अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. अद्याप अधिकृतपणे मृत्यू आणि जखमींची संख्या जाहीर झालेली नाही, परंतु स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. (हेही वाचा – धक्कादायक : दौंडमध्ये कचराकुंडीत प्लास्टिकच्या डब्यात आढळले मृत अर्भके)
भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंड सरकारांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. म्यानमारमध्ये लष्कर आणि स्थानिक स्वयंसेवक ढिगारा हटवण्यात आणि अडकलेल्यांना बाहेर काढण्यात गुंतले आहेत. थायलंडमध्येही आपत्कालीन सेवा कार्यरत झाल्या असून, बँकॉकमध्ये अनेक रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर चिंता व्यक्त करत म्यानमार आणि थायलंडमधील सर्वांच्या सुरक्षिततेची प्रार्थना केली आहे. त्यांनी ट्विटद्वारे सांगितले की, “भारत सर्वतोपरी मदतीसाठी तयार आहे. आमच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास आणि परराष्ट्र मंत्रालयाला संपर्कात राहण्यास सांगितले आहे.” (हेही वाचा – ‘लापता लेडीज’साठी आमिर खानचा ऑडिशनचा व्हिडिओ व्हायरल, एकदा बघाच !)
या भूकंपामुळे म्यानमार आणि आसपासच्या देशांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक आहे. बचावकार्य आणि नुकसानाचा आढावा घेण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असून, पुढील काही तासांत अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.