मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ख्यातनाम ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना देण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक वर्षा या शासकीय निवासस्थानी झाली.
या बैठकीस निवड समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य अनिल काकोडकर, बाबा कल्याणी, डॉ. प्रकाश आमटे, दिलीप प्रभावळकर, संदीप पाटील सहभागी झाले होते.
निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार सन 1997 पासून देण्यात येत आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
पुरस्काराचे स्वरुप रु.10 लक्ष, स्मृतीचिन्ह व मानपत्र शाल व श्रीफळ असे आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आजवरचे मानकरी –
1997 – पु. ल. देशपांडे – साहित्य,
1998 – लता मंगेशकर – संगीत,
1999 – सुनिल गावस्कर – क्रीडा,
2000 – डॉ.विजय भटकर – विज्ञान,
2001 – सचिन तेंडुलकर – क्रीडा,
2002 – पं.भीमसेन जोशी – कला/संगीत,
2003 – डॉ.अभय बंग व राणी बंग – सामाजिक प्रबोधन,
2004 – बाबा आमटे – सामाजिक प्रबोधन,
2005 – डॉ. रघुनाथ माशेलकर – विज्ञान,
2006 – रतन टाटा – उद्योग,
2007 – रा.कृ.पाटील – समाज प्रबोधन,
2008 – मंगेश पाडगांवकर – साहित्य, नानासाहेब धर्माधिकारी – समाज प्रबोधन,
2009 – सुलोचना लाटकर – मराठी चित्रपट,
2010 – जयंत नारळीकर – विज्ञान,
2011 – अनिल काकोडकर – विज्ञान,
2015 – बाबासाहेब पुरंदरे – साहित्य.