रत्नागिरी : भगवान बिरसा मुंडा जयंती दापोलीतील गोल्ड व्हॅली पांगारवाडी येथे सोमवार १५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आली. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी हार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित आदिवासी बांधवांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. भगवान बिरसा मुंडा की जय, जय आदिवासी अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सुशिलकुमार पावरा, सामाजिक कार्यकर्ते अरूण वळवी, यश वळवी, पिंगला पावरा, परी पावरा, रोहन वळवी, हॅरी पावरा यादीं उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी क्रांतीकारकांचा इतिहास खूपच महत्त्वाचा आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातील उलीहाती या गावात झाला. अनेक आदिवासी क्रांतीकारकांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली. त्यापैकी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचे बलिदान नेहमीच स्मरणीय राहणार आहे. बिरसा मुंडा यांना झारखंड, ओरीसा, बिहार, पश्चिम बंगाल या भागात देवाप्रमाणे पूजले जाते. म्हणून बिरसा मुंडा यांना भगवान, क्रांतीसूर्य सूर्य, धरती आबा, जननायक, क्रांतीकारक इत्यादीं नावांनी संबोधले जाते. बिरसा मुंडा यांचा उलगुलान विद्रोह इतरांपेक्षा वेगळा होता. त्यांच्या विद्रोहात विचारधारेचा प्रभाव दिसून येतो. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी, अन्याय, अत्याचारा विरोधात, जल, जंगल, जमीन यासंपत्तीसाठी अखंड लढा दिला. आदिवासी समूदायाला एकत्रित आणून इंग्रजाविरोधात तीव्र लढा उभारला. या महान क्रांतीकारकाचा मृत्यू ९ जून १९०० रोजी झाला. या महान योद्धाला कोटी कोटी विनम्र अभिवादन, असे मनोगत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केले.