पिंपरी : देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा, सुरक्षेचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच मतदानाचा अधिकार हे मुलभूत मानवी हक्क द्वारे प्राप्त झालेले अधिकार आहेत. मानवी हक्क आयोगाच्या घोषणा पत्रानुसार आणि भारतीय राज्यघटना अधिकार प्राप्त आहेत हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मानवी हक्क दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा सन्मान प्रसंगी व्यक्त केले.
वर्किंग पिपल्स चार्टर, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज कष्टकरी कामगारांनी विविध क्षेत्रात नैपूण्य मिळवले आशांचा मानवी हक्क दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला विभागाच्या माधुरी जलमुलवार, उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड,सुनिता देवकर, मीना जोगादंड, अलका भोसले, प्रियंका बोगडे, उषा पांचाल, विद्या पवार, रंजना भोसले आदिसह कामगार बांधव उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मूलभूत हक्कांसाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची आहुती दिलेली देश कधीच विसरणार नाही. परंतु काही लोकांकडून जाणून-बुजून स्वातंत्र्यसैनिकांचा, स्वातंत्र्य वीरांचा अवमान केला जात आहे हे लोकशाहीला मारक असून भेदभाव आणि तेढ निर्माण करणारे व्यक्तव्य केले जात आहेत. आपल्याला मिळालेले मूलभूत अधिकार लिंग, जात, वर्ग, धर्म, भाषा सामाजिक अशा अन्य दर्जाच्या आधारे भेदभाव न करता स्वतःचे हक्क प्राप्त करण्याचा अधिकार आहे. आजही बऱ्याच ठिकाणी कष्टकरी कामगारांना वेठबिगार सारखे राबवले जाते त्यासाठी कायदा झाला मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही.
कामाच्या ठिकाणी हीन वागणूक देणे. त्याचबरोबर कंत्राटदाराकडून पिळवणूक होणे असे प्रकार सुरू आहेत हे थांबले पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढाईची गरज असल्याचे मत मत यांनी नोंदवले. भूषण कदम यांनी प्रास्ताविक केले तर आभार किरण सडेकर यांनी मानले.