Saturday, October 5, 2024
Homeजिल्हापरिवर्तनाची चळवळ अधिक गतिमान करूया - माजी आमदार राजीव आवळे

परिवर्तनाची चळवळ अधिक गतिमान करूया – माजी आमदार राजीव आवळे

कोल्हापूर : आजच्या जात, धर्म आणि लिंगभेद वाढत असल्याच्या काळा प्रतिगामी शक्तींना थोपवण्यासाठी पुरोगामी आणि समतावादी भूमिका घेऊन परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या विविध सामाजिक भान जपणाऱ्या मानवतावादी लोकांनी परिवर्तनाची चळवळ अधिक गतिमान करणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार राजीव आवळे यांनी व्यक्त केले. 

प्रबोधन जनतेचे या निर्मिती विचारमंचाच्या उपक्रमा अंतर्गत परिवर्तनवादी चळवळीचे राजकिय नेते माजी आमदार राजीव आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार राजीव आवळे यांचा नागरी सत्कार आणि सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे कुळवाडी कुळभूषण, बहुजन प्रतिपालक, लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर मंगळवार दि. 1 मार्च रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी कुळवाडी कुळभूषण, बहुजन प्रतिपालक, लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर बोलताना डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचे राजे नसून ते बहुजनांचे राजे आहेत. त्यांना एका जातीत बंदिस्त करणे योग्य होणार नाही. भारतीय संविधानाने छत्रपती ही पदवी संपुष्टात आणली असून आज कोणीही स्वतः ला स्वयंघोषित छत्रपती म्हणून घेऊ नये.

यावेळी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अमर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. रघुनाथ कांबळे आणि ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांच्या हस्ते सत्कार माजी आमदार राजीव आवळे यांचा बुद्धांचा प्रतिमेची फ्रेम व सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी समता उद्योग समूह निर्मित आक्काच्या सेंद्रिय गुळाची पोळी व निर्मिती प्रकाशन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समग्र साहित्य डिजिटल ॲपच्या पोस्टरचे अनावरण स्मिता आवळे आणि क्रांती आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे निमंत्रक सेक्युलर सोशल फ्रंटचे अध्यक्ष अनिल म्हमाने, बहुजन रयत परिषदेचे नेते अब्राहमबापू आवळे, प्रा. किसनराव कुराडे, ॲड. करुणा मिणचेकर, प्रा. शोभा चाळके, रोहित चांदणे यांची भाषणे झाली. मोहन मिणचेकर, सिद्धार्थ कांबळे, शांतीलाल कांबळे, विमल पोखर्णीकर, वृषाली कवठेकर, रेश्मा गायकवाड, राहूल आवळे, पूजा चांदणे, विशाल देवकुळे, बाजीराव नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणारे व माजी आमदार राजीव आवळे प्रेमीं लोक उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय