पिंंपरी चिंचवड : पत्राशेड लिंकरोड पुनर्वसन प्रकल्पातील सदनिकांची सोडत तात्काळ करा, अशी मागणी पिंपरी चिंचवड कॉग्रेसच्या वतीने असंघटित कामगार काँग्रेसचे सुंदर कांबळे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भाटनगर पत्राशेड लिंकरोड पुनवर्सन प्रकल्पातील 672 लाभधारक हे असंघटित क्षेत्रातील कामगार असून ते बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, घरेलु महिला कामगार, माथाडी कामगार रिक्षा चालक, हातगाडी टपरी पथारी कामगार, ड्रायव्हर अशा विविध क्षेत्रातील कामगार आहेत. भाटनगर पत्राशेड पुनवर्सन प्रकल्प हा गेली १२ वर्षापासून बांधून तयार असून न्यायालयातील बाबीसाठी तो प्रकल्प रखडला होता. परंतु जून 2019 रोजी तो प्रकल्प नागरिकांना देण्यासाठी खुला करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये 672 सदनिका तयार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना प्राधीकरणातील योजना या सर्व योजनाची सोडत व कामपूर्ण झाले नाही. तरीपण सोडत काढली जाते. पंतप्रधान आवास योजनेतबा बो-हाडेवाडी, च-होली, रावेत येथील 3664 सदनिकांचे काम 10% देखील पूर्ण झाले नाही तरी देखील 26-02-2021 रोजी या योजनेतील घरांची सोडत केली आहे. मग भाटनगर येथील 672 सदनिका पूर्णपणे बांधून तयार आहेत. त्यामधील लाभार्थ्यांनी प्रत्येकी स्वहिस्सा 50,000 रूपये भरला आहे. त्याचे बायोमॅट्रीक देखील झाले आहे.
त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन विभागामार्फत २३ मार्च २०२१ सदनिका सोडतीचा दिनांक व वेळ ठरविला होता. परंतु भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांनी या सोडतिला कोरोनाचे कारण दाखवून ख-या अर्थाने विरोध दर्शविला आहे व पाचही बिल्डिंगचे दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यावर सदनिका सोडत करावी असे सांगितले. यामुळे पुन्हा एकदा या प्रकल्पामधील 672 सदनिका धारकांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक भागांमध्ये पुनर्वसन प्रकल्प राबवले जातात व काम अपूर्ण अवस्थेत असले तरीही त्या प्रकल्पाचे सोडत काढली जाते? मग पत्राशेड लिंकरोड पुनर्वसन प्रकल्पाचे १०० % काम पूर्ण होवून सदनिका धारकांनी स्वहिस्सा प्रत्येकी ५०,००० भरून व पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत बायोमॅट्रीक करून देखील या प्रकल्पाची सोडत का काढली जात नाही याच सोडतिला भारतीय जनता पक्षाचा विरोध का ? असा सवाल कॉग्रेसने केला आहे.
पत्राशेड लिंकरोड पुनर्वसन प्रकल्पातील सदनिकांची सोडत तात्काळ करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा असंघटित कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदेश नवले, हातगाडी टपरी पथारीचे जिल्हा समन्वयक अजरूद्दीन पुणेकर, राजीव गांधी प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष आबा खराडे, सोशल मिडीया जिल्हा समन्वयक मोहन उनवणे यांनी दिला आहे.