उपक्रमास पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिल्या शुभेच्छा !
मुंबई, दि. 2 : राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेच्यामार्फत “माझा पशुपालक, माझी जबाबदारी” हे नाविन्यपूर्ण अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी आज ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी कौतुक करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
केदार म्हणाले, कोविड जागतिक महामारीमुळे नागरिकांना बाहेर फिरण्यावर शासनाने वेळोवेळी “गरजेप्रमाणे निर्बंध लावले होते आणि आहेत. अनेक उद्योग व्यवसाय काहीशे ठप्प झालेत किंवा धीम्या गतीने सुरू आहेत. अनेक नागरिकांना जास्तीत जास्त वेळ घरात थांबून राहावे लागत आहे. परंतु या परिस्थितीत ऑनलाईन मिटींग्स, मार्गदर्शनपर शिबिरे / व्याख्याने यासारखे उपक्रम अगदी खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आणि लोकप्रियदेखील झाले.
महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेनेदेखील पशुपालक व पशुवैद्यक यांचेसाठी पशुवैद्यक क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांची अनेक तांत्रिक व्याख्याने पहिल्या लॉकडाऊनच्या कालावधीत आयोजित केली होती. त्यांना प्रतिसाद देखील जोरदार मिळाला होता. सद्य:परिस्थिती पशुपालक यांचे मेळावे घेण्यावर काही बंधने असल्याने अभियानाची सुरुवात ऑनलाईन व्याख्यान मालिका घेऊन करण्यात येणार असल्याची माहिती केदार यांनी दिली.
आज राज्यात ३०-३५ फेसबुक ग्रुप्स वर ७-८ लक्ष तरुण पशुपालक सक्रिय पध्दतीने पशुपालन व्यवसाय त्यांचे तांत्रिक ज्ञान आणि त्यातील नवनवीन संधी आणि आव्हाने याबाबत नवनवीन तंत्रज्ञान यावर चर्चा करुन ज्ञानाचे आदानप्रदान करताना दिसत आहेत असे केदार यांनी सांगितले.
आजच्या ऑनलाईन प्रशिक्षण अभियान व त्याअनुषंगाने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांस माझे नेहमी सहकार्य राहील. “माझा पशुपालक, माझी जबाबदारी” या महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेचा उपक्रमात नेहमी शासन सोबत असेल असे केदार यांनी यावेळी सांगितले.