भाजपच्या हिंस्त्र राजकारणा विरोधात शेतकरी एकजूट मजबूत करणार – किसान सभा
अकोले : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. अजय मिश्र टेनी यांच्या गुंडांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकरी भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात येऊन जबर जखमी झाले. संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनात आजवर ६३१ शेतकरी शाहिद झाले. शेतकरी आंदोलनात शाहिद झालेल्या या शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आदरांजली वाहण्यासाठी विविध संघटनांकडून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये किसान शहीद अस्थिकलश यात्रा काढण्यात आलेली आहे. या किसान शहिदांच्या अस्थी असलेले कलश महाराष्ट्रात आणण्यात आले असून शेतकऱ्यांच्या चळवळीचे ऊर्जास्थान असलेल्या पुण्यातील महात्मा जोतीराव फुले यांच्या वाड्यातून या अस्थिंच्या कलशांची यात्रा दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्यात आली.
राज्यभरातील 19 जिल्ह्यामध्ये फिरून ही यात्रा 16 नोव्हेंबर रोजी अकोले जिल्हा अहमदनगर येथे दुपारी पोहचली. किसान सभेचे राज्य पदाधिकारी व बुलढाणा जिल्ह्यातील लढाऊ शेतकरी नेते कॉम्रेड जितेंद्र चोपडे यांच्या नेतृत्वाखाली कलश यात्रेचे अकोलेत आगमन झाले. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य कौन्सिल सदस्य सदाशिव साबळे, नामदेव भांगरे जिल्हा समिती सदस्य ज्ञानेश्वर काकड, नंदू गवांदे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. कारभारी उगले, कॉ. आर. डी. चौधरी, विद्रोहीचे साथी स्वप्नील धांडे, स्वाभिमानीचे सुरेश नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोले येथील महात्मा फुले चौक येथे कलश यात्रेचे हजारो शेतकरी व कामगारांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
जनवादी महिला संघटनेच्या वतीने जुबेदा मणियार, आराधना बोऱ्हाडे, मथुराबाई बर्डे, प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे यांनी शाहिद कलशाला अभिवादन केले.
भाजप प्रणित केंद्र सरकारच्या हिंस्त्र राजकारणाचा धिक्कार करत यावेळी अकोले शहरातून शाहिद कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
अकोले येथील बाजार तळावर मिरवणुकीचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने शहिदांना अभिवादन करून सभेला सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारने शेती व शेती क्षेत्र कॉर्पोरेट कंपन्यांना आंदण देण्यासाठी आणलेले 3 कृषी कायदे तातडीने रद्द करावेत व शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा केंद्रीय कायदा करावा अशी मागणी यावेळी विविध वक्त्यांनी केली.
महाराष्ट्र सरकारने केंद्रांच्या कायद्याची हुबेहूब नक्कल करत महाराष्ट्रात हे कायदे मागील दाराने लागू करण्याची धडपड सुरू केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने अशा प्रकारे केंद्राचे कायदे महाराष्ट्रात लागू करण्याची कोणतीही कृती करू नये अन्यथा त्यांनाही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी किसान सभेच्या वतीने देण्यात आला.
केंद्र सरकारने 12 लाख टन सोयापेंड आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर 11000 वरून कोसळून 5000 रुपया पर्यंत खाली आले आहेत. एफ. आर. पी. चे तुकडे करण्याचे प्रयत्न विविध कारखान्यांकडून सुरू आहेत, दुध दर वेगवेगळी कारणेपुढे करून पाडण्यात येत आहेत, आशा कर्मचारी, अंगणवाडी ताई, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, शालेय पोषण आहार कर्मचारी, एस.टी. कर्मचारी, विधवा, परित्यक्ता, निराधार, अपंग, वृद्ध आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यात सातत्याने संघर्ष करत आहेत. राज्य व केंद्र सरकर या श्रमिकांच्या मागण्यांकडे हेतुतः दुर्लक्ष करत आहे. सर्व सहयोगी संघटनांना साथीला घेत लाल बावटा या श्रमिकांचे लढे अत्यंत नेटाने पुढे घेऊन जाईल व येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये जनतेला एक सक्षम राजकीय पर्याय देईल असा विश्वास यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
तालुक्यात सध्या अत्यंत संधीसाधूपणाचे राजकारण सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तालुक्याच्या जनतेने मोठ्या विश्वासाने बदलाचा कौल दिला. जनतेने दिलेला हा कौल कशासाठी होता याचे सदोदित स्मरण ठेवून पुढील वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. उथळ व संधीसाधू कृती टाळून सर्व संबंधितांनी याबाबत गांभीर्याने वर्तन करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी माकपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
कॉ. ज्ञानेश्वर काकड, कॉ. नंदू गवांदे, कॉ. प्रकाश साबळे, कॉ. खंडू वाकचौरे, कॉ. अविनाश धुमाळ, कॉ. शिवराम लहामटे, कॉ. संदीप शिंदे, भाऊसाहेब मेंगाळ, कॉ. बाबुराव भालके आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.