हडपसर / डॉ. अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजमध्ये प्रयोगशाळा उद्घाटने व विद्यार्थी गुणगौरव समारंभ बुधवार दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी IAS (Retd.), कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख IAS (Retd.) उपस्थित होते.
तसेच सन्माननीय उपस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन आमदार चेतन तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमर तुपे, प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड हे उपस्थित होते.
महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्र, फिजिक्स लॅब, एम. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स लॅब, फॅशन टेक्नॉलॉजी विभाग, ब्युटी अँड वेलनेस विभाग आणि मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागाच्या ऑडिओ-व्हिज्युअल स्टुडिओचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, एस. एम. जोशी कॉलेज हे गुणांची खाण आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी सर्वोच्च पातळीवरील यश मिळविले आहे. कला, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे. स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत आल्यानंतर प्रशासन सुधारण्यासाठी कार्य करावे. कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणले. त्याप्रमाणे प्राध्यापकांनी कर्मवीरांचा वसा आणि वारसा पुढे चालवावा. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे मत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेमधून चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून तिचा गौरव केला जात आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दसेत स्वतःचे ध्येय ठरवून झपाटून अभ्यास केला पाहिजे. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत ज्ञानार्जन करायला पाहिजे. कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे मत रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन आमदार चेतन तुपे यांनी यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे कौतुक केले. यशाची ही परंपरा पुढेही अशीच टिकून ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार आय.क्यू.ए.सी. समन्वयक व उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिनकर मुरकुटे आणि डॉ. रंजना जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी कॉलेजमधील प्राध्यापक, कार्यालयीन सेवक साधना शैक्षणिक संकुलातील प्राचार्य, मुख्याध्यापक, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


