कोल्हापूर : मराठा आंदोलनाचे निर्णय छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वाखालीच होणे गरजेचे असल्याचे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने म्हटले आहे.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात गेली कित्येक वर्ष लढा चालू आहे यासाठी आज आर पार ची लढाई सुरू आहे मराठा समाजातील सर्वच घटकांनी आपआपले राजकीय पक्ष संघटना बाजूला ठेवून खासदार छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वाखाली सर्वसहमतीने हे आंदोलन निर्णय होईपर्यंत चालू ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय झालेला आहे. यामध्ये अगदी१९८२ सालापासून या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या घटकांनी सहभागी होऊन एक संघ आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.
असे असताना छत्रपती संभाजीराजे व प्रमुख समन्वयकांच्या अपरोक्ष एखाद्या आंदोलनाची हाक देणे अयोग्य आहे. आंदोलन करणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क व अधिकार आहे. पण एखाद्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा समाजाने एकमुखाने निर्णय घेतला असेल आणि त्याउलट कोणी समाज बांधव आंदोलनाची हाक देत असेल तर ते चुकीचे होईल.
आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या कोल्हापुरातच नेतृत्व व प्रमुख समन्वयकांच्या सहमतीशिवाय आंदोलन होत आहे. असा चुकीचा संदेश राज्यात आणि देशपातळीवर जाईल आणि मूळ विषयाला बगल मिळून मुख्य आरक्षणाच्या प्रश्नाचे गांभीर्य संपेल याची नोंद सर्वच समाज बांधवांनी घेणे गरजेचे आहे, असेही म्हटले आहे.
या आंदोलनातील एखादा टप्पा आंदोलन करायचा असेल तर समन्वयक आणि छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर करावा त्याप्रमाणे सर्व समाज बांधव सक्रिय होतील, असेही नागरी कृती समितीचे आशेक पोवर, ॲडव्होकेट रणजीत गावडे, रमेश मोरे, दादासाहेब लाड, माणिक मंडलिक, भाऊ घोडके, महेश जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी, राजेश वरक, अजित सासणे, विनोद डुणूगं, पप्पू सुर्वे यांनी म्हटले आहे.