कोल्हापूर, दि. 23 : जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व कंपन्यांच्या सर्व पेट्रोल पंपावर मुख्य महामार्ग बंद झाल्यास किंवा अंतर्गत रस्ते बंद झाल्यास पेट्रोल डिझेलची टंचाई येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत संबंधित कंपन्यांच्या सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा शिल्लक राहण्याकरिता पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत पेट्रोल व डिझेल हे केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच वितरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले.
पोलीस वाहने, आरोग्य विभागाची वाहने, ॲब्युलन्स, वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींची शासकीय/ खासगी वाहने, शासकीय वाहने, महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था यांची वाहने, कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची खासगी वाहने (शासकीय ओळखपत्र पाहून) ज्या स्वयंसेवी संस्था पूर परिस्थितीत काम करत आहेत त्यांची वाहने (त्यांच्या लेटरहेडवरील तसे पत्र पाहून) एनडीआरएफ, एसडीआरएफ, व्हाईट आर्मी, विमानतळ प्राधिकरणाची वाहने मदतकार्य करणारी वाहने या वाहनांना पेट्रोल व डिझेल वितरीत करण्यात यावे.
या आदेशाचा भंग करणारी कोणतीही व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकान्वये दिला आहे.