Saturday, May 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

39 फूट पाणी पातळीवर नागरिकांचे स्थलांतरण; प्रशासनाला सहकार्य करावे – पालकमंत्री सतेज पाटील

---Advertisement---

कोल्हापूर :- 39 फूट पाणी पातळी झाल्यावर खबरदारी म्हणून नागरिकांचे स्थलांतरण करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. नागरिकांनी त्याला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.   

             पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर व पूरपस्थितीबाबत आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी यावेळी जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा आणि पडणारा पाऊस याबाबत आढावा घेतला. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. 

---Advertisement---

           पालकमंत्री यावेळी म्हणाले, गेल्या 15 ते 20 वर्षात पडलेल्या पाऊसाची आणि धरणातील पाणीसाठा यांच्या सरासरीबाबत एक आराखडा तयार करावा. त्यानुसार 1 जुलै रोजी जिल्ह्यातील धरणांमध्ये काय स्थिती असेल याची माहिती देवून पाणीच्या विसर्गाबाबत नियोजन करावे. जिल्ह्यातील प्रत्येक धरणाच्या ठिकाणी बेस स्टेशन बसवून संदेश वहनासाठी वॉकी टॉकीचे नियोजन करावे. पोलीस विभागाचे स्टॅटीक वापरुन समांतर संदेश वहन यंत्रणाही माहिती देण्यासाठी उभी करावी.  

आवश्यक त्या ठिकाणी 75 ट्रान्स्फॉर्मर्स 

 महावितरणला दिलेल्या सूचनेनुसार 75 ट्रान्स्फॉर्मर्स जिल्ह्यातील त्या त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. खांब पडला तर अडचण येवू नये यासाठी 2 हजार विजेचे खांब विकत घेण्यात आले आहेत. 

            येत्या तीन दिवसात त्या त्या तालुक्यांमध्ये पोहोच होणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे 50 लाईफ जॅकेट विकत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, विजेच्या तारा कोठून गेल्या आहेत, कोठे ट्रान्स्फार्मर्स आहेत याची माहिती मॅप मार्कर ॲपच्या माध्यमातून अपलोड करण्यात येत आहे. या माहितीमुळे आपत्ती व्यवस्थापनात बोटी घेवून जात असताना सुलभतेने मदत होणार आहे.  

25 नव्या बोटींची खरेदी

             आपत्ती व्यवस्थापन म्हणून 25 नव्या बोटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरात पहिल्या टप्यात 10 ते 15 बोटी उपलब्ध होतील. सध्या 20 बोटी कार्यान्वित आहेत. महापालिकेच्या 11 बोटी आहेत. त्याबरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी किमान दोन बोटी देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सक्षम होईल. महापालिका आयुक्तांनीही जिल्ह्यातील 25 ते 29 कमी आणि जास्त बाधित प्रभागांचा आढावा दिला आहे. शिंगणापूर पाणी योजना ही कमाल पाणी पातळीत कशी चालू ठेवता येईल याबाबतही उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

             जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या सूचना देवून पालकमंत्री म्हणाले, 39 फूटावर पाणी पातळी गेल्यानंतर खबरदारी म्हणून नागरिकांचे स्थलांतर करण्याची भूमिका घ्यावी. सर्व प्रथम जनावरांना बाहेर काढण्यात यावे. कारण जनावरांसाठी नागरिक पाठीमागे थांबत असतात. याबाबत एसओपी तयार करावी. जेसीबी, पोकलेन आणि जनरेटर याची यादी तालुकानिहाय तयार ठेवावी. त्याचबरोबर ते चालवणारे चालक यांचीही यादी आणि संपर्क क्रमांक तयार ठेवावेत. आंबेवाडी, चिखली या गावांमध्ये आधीच जेसीबी ठेवता येईल का याबाबतही नियोजन करावे. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. 

        यावेळी  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महावितरणचे कार्यकारी अभियंता सागर मारुलकर यांनी यावेळी तयारीबाबत माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles