परळी वैजनाथ / अशोक शेरकर : २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून संसदेत आवाज उठवावा या मागणीचे निवेदन खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंळाने सोमवारी (ता.१६) दिले असल्याची माहाती कॉ. अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
खरीप २०२० चा पिक विमा मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मागील एक महिन्या पासुन आंदोलन व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. बीड जिल्हयातील खासदार, आमदार या लोकप्रतिनिधींना किसान सभेच्या वतीने पिक विमा प्रश्नावर निवेदन देऊन विधीमंडळ व संसदेत आवाज उठविण्यासाठी आग्रह धरण्यात आला. सोमवारी (ता.१६) परळी येथे खा.डॉ.प्रीतम मुंडे याना भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी शिष्टमंडळाने पिक वीमा प्रश्न हा वीमा कंपनीने जाचक अटी शर्ती टाकुन जटील केला आहे. महसुल विभागाने परतीच्या पावसाने नुकसान झाल्याचा अहवाल दिलेला आहे. हा अहवाल ग्राहय धरूण बीड जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक वीमा मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली. यावर शेतकऱ्यांना पिक वीमा मिळावा यासाठी केंद्रीय कृषीमंत्री व पिक वीमा कंपनीच्या अधिकाऱ्यां सोबत चर्चा करते. गरज पडल्यास राज्याच्या कृषीमंत्र्यांची भेट घेईल असे आश्वासन खा. मुंडे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळास दिले.
किसान सभेच्या शिष्टमंडळात माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. पी.एस.घाडगे, कॉ. पांडुरंग राठोड, किसान सभेचे बीड जिल्हा सचिव कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.पांडुरंग राठोड, कॉ.परमेश्वर गीत्ते, कॉ.प्रकाश चव्हाण यांचा समावेश होता अशी माहिती कॉ. अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.