वन विभागाने शेतात लावलेली झाडे उपटून टाकत अभयारण्यात निदर्शने
वन अधिकाऱ्यांची दादागिरी सहन करणार नाही : कॉम्रेड नामदेव भांगरे
अकोले : आदिवासी शेतकरी वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनी हिसकावून घेण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हरिश्चंद्र अभयारण्य परिसरात वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये रानटी झाडे लावण्याचे प्रकार सुरू केले आहेत. अभयारण्य परिसरात लव्हाळी ओतूर येथे वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये रानटी झाडे लावली. आदिवासींची उभी पिके उध्वस्त करण्याचे प्रयत्न केलेे. वन विभागाच्या या अन्यायाविरोधात किसान सभा मैदानात उतरली असून वन विभागाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये लावलेली ही रानटी झाडे उपटून काढण्यासाठी गावोगाव मोर्चे काढण्याची सुरुवात किसान सभेने केली, असल्याची माहिती किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड नामदेव भांगरे यांनी दिली.
हे वाचा ! दलित साहित्याची कोंडी आदिवासी साहित्य प्रवाहाने फोडली – डॉ. श्रीपाल सबनीस
अभयारण्य परिसरातील लव्हाळी येथील मारुती मंदिरात सभा घेऊन व वाजत गाजत मोर्चा काढत शेतातील वन विभागाची रानटी झाडे उपटून फेकत या अभियानाची सुरुवात करण्यात केली आहे. आदिवासी शेतकरी कसत असलेली जमीन कसणारांच्या नावे करण्यासाठीची प्रक्रिया देशभर सुरू आहे. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी यासाठी विहित प्रक्रिये अंतर्गत वनाधिकार ग्राम समित्यांकडे यासाठी अर्ज केले आहेत.
किसान सभेच्या पुढाकाराने परिसरातील हजारो गरीब शेतकऱ्यांची वन प्रकरणे पात्र करण्यासाठी अपिले दाखल करण्यात आली आहेत. असे असताना कोणत्याही आदेशाची किंवा अंतिम निकालाची वाट न पाहता वन विभाग आदिवासींच्या शेतात अशा प्रकारे घुसणार असेल तर आदिवासींना किसान सभेच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात घुसावे लागेल असा इशारा यावेळी किसान सभेचे कॉ. नामदेव भांगरे यांनी दिला आहे.
हे वाचा ! घोडेगाव : वाचन चळवळ हीच समाजपरिवर्तनाची नांदी
भर पावसात वाजत गाजत काढण्यात आलेल्या या मोर्चात अभयारण्य परिसरातील 23 गावचे शेतकरी सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्य व क्रांतिकारक घोषणा देत मारुती मंदिरातून मोर्चाला सुरुवात झाली. गावाच्या मुख्य रस्त्यावरून मोर्चा अभयारण्यात नेण्यात आला. हरिश्चंद्रगड निम्मा चढत मोर्चा अभयारण्यातील शेतात नेण्यात आला. शेकडो शेतकरी मोर्चाने डोंगर चढत शेतात पोहचले. शेतकऱ्यांच्या शेतात लावलेली झाडे उपटत यावेळी वन विभागाच्या अन्यायाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. उपटलेली झाडे वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जंगलामध्ये नेऊन लावली गेली.
वन विभागाने नुकतेच महसूल विभागाच्या मदतीने तालुक्यातील अभयारण्य परिसरातील 32 गावातील मालकी जमिनीवर वन विभागाचे नाव लावणार असल्याचे अत्यंत संतापजनक आदेश काढले होते. आ. डॉ. किरण लहामटे व किसान सभेने या बाबत आदिवासी शेतकऱ्यांची बाजू घेत या आदेशाची अंमलबजावणी थांबवली होती. आता त्यानंतर वन विभागाने शेतात झाडे लावण्याची आगळीक करून पुन्हा अभयारण्य परिसरातील वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न केले आहेत. किसान सभा वन विभागाचे असे प्रयत्न खपवून घेणार नसल्याचा इशारा किसान सभेने दिला आहे.
आनंददायी बातमी : खाद्यतेल स्वस्त होणार; पहा कसे ते !
लाव्हाळी ओतूर येथून या विरोधात सुरू झालेले अभियान संपूर्ण तालुकाभर राबविण्यात येणार असून वन विभागाने शेतात लावलेली रानटी झाडे परिसरातील शेतकरी सामुहिकपणे उपटून काढणार आहेत. वन विभागाच्या अन्याया विरोधात केलेल्या या आंदोलनाचे परिसरात स्वागत होत आहे.
किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य नामदेव भांगरे, सदाशिव साबळे, जिल्हा कौन्सिल सदस्य राजू गंभीरे, एकनाथ मेंगाळ, भीमा मुठे, लक्ष्मण घोडे, भाऊसाहेब साबळे, शिवराम लहामटे, मधुकर नाडेकर, भास्कर बांडे, किसन बांडे आदी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
हे वाचा ! बीड : पुरग्रस्त भागातही शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी