घोडेगाव : निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या बाळहिरड्याच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन वर्ष उलटले; तरी नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार किसान सभेच्या आंबेगाव तालुका समितीने निवेदनाद्वारे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे, अशी माहिती किसान सभेचे तालुकाध्यक्ष कृष्णा वडेकर व उपाध्यक्ष राजू घोडे यांनी दिली.
राज्यात जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे शेतीपिकांचे, फळबागांचे आणि घरे व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. याबरोबरच या तालुक्यातील आदिवासी समाजाचे मुख्य उत्पन्नाचे साधन असलेल्या हिरडा फळाचा ऐन हंगाम असतानाच हे चक्रीवादळ झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते.
हिरडा नुकसानीचे पंचनामे तालुका कृषी कार्यालयाने केलेले आहेत व हे पंचनामे तालुकास्तरीय महसूल यंत्रणेने जिल्हास्तरीय महसूल यंत्रणेकडे सुपूर्त केलेले आहेत. परंतु, अद्यापही या शेतकऱ्याना नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही. याबाबत संघटनेच्या वतीने मागील काही महिने सातत्याने प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सभेचे सचिव अशोक पेकारी, तालुका समिती सदस्य रामदास लोहकरे, सुभाष भोकटे यांनी सांगितले.
या वर्षीही हिरड्याला अवकाळी पाऊसाचा फटका
गेल्या वर्षी हिरड्याचे मोठे नुकसान होते. परंतु यावर्षीही अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हिरड्याचा बहार झडून गेला आहे. त्यामुळे यावर्षी सुध्दा हिरड्याचे उत्पादन घटणार आहे.