शिरढोण : रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ बाधीत शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत गेली तीन वर्षे झाली संघर्ष सुरू आहे. बहुतांशी मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे महामार्गाचे काम झपाट्याने पूर्ण होत आहे. किसान सभेच्या वतीने ज्या बाधित क्षेत्रात शेतकर्यांवर अन्याय झाला नाही त्याठिकाणी काम करण्यास मज्जाव कधीच केला नाही. पण ज्या बाधीत क्षेत्रात शेतकर्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत तिथे किसान सभेच्या वतीने विरोध करण्यात येत होता. यामागे एकच भूमिका होती. शेतकर्यांना कायदेशीररीत्या नुकसान भरपाई मिळावी. या सगळ्या संघर्षात केसेस झाल्या काही केसमध्ये कोर्ट प्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षा सुनावली आहे. अजूनही बाधीत शेतकर्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याबद्दल सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
शिरढोण तालुका कवठेमहांकाळ येथे महामार्गासाठी अतिरिक्त जमीन बाधित होत आहे. त्यानुसार नॅशनल हायवे कडून मार्कींग केल्यानंतर किसान सभेच्या वतीने त्यामध्ये नव्याने बाधीत बांधकामे बोअरवेल फळझाडे बाधीत होत असल्याने या सर्व बाधित शेतकर्यांच्या बाधीत क्षेत्राचा व बाधीत बांधकामाचा सर्वे करा या सर्व बाधित शेतकर्यांना संपूर्ण नुकसान भरपाईची निवाडा नोटीस तातडीने द्या या मागणीसाठी ऑक्टोबर २०२० पासुन पाठपुरावा करण्यात येत आहे. या मागण्या संदर्भात शिरढोण तालुका कवठेमहांकाळ येथे शांततेच्या मार्गाने (ता. ४ मार्च) पासुन बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज धरणे आंदोलनला 50 दिवस पूर्ण झाले आहेत
देशभर महामार्गाच्या कामामध्ये बाधीत होणार्या घरांना भूमीअधिग्रहण कायद्यांनुसार नुकसान भरपाई मिळाली आहे. बाधीत या शब्दाचा अर्थ महामार्गा जवळ राहण्यायोग्य नसणारे घर असे असताना देशभर वेगळा नियम आणि शिरढोण मध्ये वेगळा नियम कसा लावता येईल असा प्रश्न किसान सभेने उपस्थित केला आहे.
महामार्गाचे काम करीत असताना झालेल्या चुका शेतकर्यांच्या माथी मारू नका – किसान सभा
महामार्ग बाधित शेतकर्यांच्या संपूर्ण निवाडा नोटीस हातात मिळे पर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे. देशभर कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. राज्यात लॉकडाऊन सुरू आहे शेतकर्यांच्या जिवाशी खेळणे प्रशासनाने बंद करावे. यासर्व पार्श्वभूमीवर बाधित शेतकर्यांच्या निवाडा नोटीस तातडीने द्याव्यात अशा मागणीचे निवेदन आज कवठेमहांकाळचे तहसीलदार बी. जी. गोरे यांना किसान सभेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉ. दिगंबर कांबळे, रजनीकांत पाटील, बाळासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, मच्छिंद्र पाटील, अमित पाटील, ए. वाय. पाटील उपस्थित होते.