Tuesday, February 11, 2025

किल्ले शिवनेरी येथून किसान सभेच्या मार्चला सुरुवात; ९ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

जुन्नर : मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करा, या मागणीला घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या पदयात्रेतला किल्ले शिवनेरी ( ता. जुन्नर ) येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आज सुरुवात झाली. 

मनरेगाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष अँड. नाथा शिंगाडे यांनी सांगितले. 

आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड तालुक्यातून प्रत्येकी २० ते ३० प्रतिनिधी चालत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे येणार आहे. सदर मार्च आज निघाला असून  शुक्रवारी ९ आक्टोबर २०२० रोजी पुणे येथे पोहचतणार आहे. लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे म्हटले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण, आदिवासी भागात रोजगाराची नितांत गरज आहे, या पार्श्वभूमीवर मे-२०२० मध्ये किसान सभेने घोडेगाव, ता.आंबेगाव येथे आंदोलन केले होते.

गावाच्या पातळीवर लोकांना हाताला रोजगार हमीच्या माध्यमातून काम मिळावे यासाठी प्रयत्न केले गेले. याची दखल घेत पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेत मनरेगा विशेष रोजगार अभियान – पुणे जिल्हा परिषद अंतर्गत सुरु केले व मजूरांना कामाची मागणी करण्यासाठी गुगल फॉर्म उपलब्ध करून दिला गेला. हे अत्यंत महत्त्वाचे काम जिल्हा परिषद प्रशासनाने केले होते. या अभियानाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे १० हजार पेक्षा लोकांनी कामाची मागणी नोंदवली होती. परंतु तालुका स्तरावर यातील केवळ ५ ते १० टक्के लोकांना काम उपलब्ध करून दिले गेले.

लोकांना कामाची प्रचंड गरज असताना प्रशासनाने विविध कारणे दाखवून लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले. संघटनेच्या वतीने लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी आंबेगाव, जुन्नर, शिरूर व खेड तालुक्यात तालुका व गाव स्तरावर प्रयत्न केले गेले. याचा परिणाम म्हणजे जुन्नर तालुक्यात १२ गावात व आंबेगाव तालुक्यात ४ गावात व शिरूर तालुक्यात एका गावात फक्त काम उपलब्ध झाले. उर्वरित हजारो लोकांना कामाची गरज असताना काम उपलब्ध झालेले नाही. 

आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात अजून कोरोना ने शिरकाव केलेला नाही. ही अत्यंत जमेची बाजू आहे. यासाठी प्रशासनाने जसे प्रयत्न केले गेले आहे.  तसेच संघटनेने ही प्रयत्न केले असल्याचे म्हटले आहे. परंतु रोजगारासाठी आता या भागातील लोक स्थलांतरीत होऊ लागले आहे, यासाठी गावातच लोकांच्या हाताला रोजगार हमीच्या माध्यमातून काम मिळाले द्या, जिल्हा परिषदेकडे कामाची मागणी करूनही काम उपलब्ध झालेले नाही अशा सर्व मजूरांना बेरोजगार भत्ता मिळावा, किमान पाच मजूरप्रधान कामे आंबेगाव,जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतच्या शेल्फवर ठेवावीत, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील रोजगार हमीच्या कामांचे सोशल ऑडिट व्हावे, रोजगार हमीवर काम करून दोन – दोन महिने अजून ज्या मजुरांना पगार मिळाला नाही त्यांना त्यांच्या कामांची मजुरी तात्काळ अदा करावी, किमान वेतन पेक्षा ज्यांना कामाची मजूरी कमी मिळाली आहे,त्यांना ती मजूरी किमान वेतन दराने मिळावी, ग्रामपंचायत स्तरावर कामाची मागणी करणारे अर्ज उपलब्ध ठेवावेत, रोजगार सेवकांचे प्रलंबित मानधन त्वरित अदा करावे, आदी मागण्यांना घेऊन हा मार्च निघाला आहे.

यामध्ये किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, तालुका अध्यक्ष डॉ. मंगेश मांडवे, तालुका सचिव लक्ष्मण जोशी, संजय साबळे, धर्मा कोरडे, नारायण वायळ, आंबे – पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे, एस एफ आय चे केंद्रीय कमिटी सदस्य सोमनाथ निर्मळ, राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे, राज्य कमिटी सदस्य राजू शेळके, रवि साबळे, अक्षय निर्मळ आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles