अकोले : ‘उत्सव स्त्री शक्तीचा-जागर आदिवासी कुळसायांचा’ कार्यक्रम अकोले तालुक्यातील खेतेवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि.०७ ते १५ अॉक्टोबर या कालावधीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमा दरम्यान हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, लग्नाची – शिमग्याची गाणी, आदिवासी प्रश्न मंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, खेळ मानाच्या फडकीचा, आदिवासी नृत्य, पारंपारिक लेझीम असे अनेक कार्यक्रम या सार्वजनिक उत्साहात साजरा करण्यात आले होते.
बिरसा ब्रिगेड पुणे अध्यक्ष प्रवीण पारधी, बिरसा ब्रिगेड सचिव खेड लक्ष्मण मदगे यांनी सामाजिक विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच, माऊली दाभाडे, मोहन उंडे यांनी आदिवासी विचारधारा, आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या व संस्कृती संवर्धन कशाप्रकारे करावे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा दरम्यान तालुक्याचे आमदार किरण लहामटे यांनी या ठिकाणी भेट दिली. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बिरसा ब्रिगेड, आदिवासी विचारमंच व समस्त खेतेवाडीकरांचे कौतुक केले.
दरम्यान, विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व वह्या बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. सदर नऊ दिवसांत लहान मुले, प्रौढ, महिला वर्ग या सर्वांचीच मोठी उपस्थिती होती.