पुष्पा’, ‘आरआरआर’नंतर आता साऊथच्या ‘केजीएफ 2’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरात 134.50 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. शंभर कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी आपला निर्मिती खर्च वसूल केला आहे.
सुपरस्टार यशची मुख्य भूमिका असलेल्या 2018 साली प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ’चा हा रिमेक आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन अनेकदा लांबणीवर पडले होते. अखेर, 14 एप्रिलला जगभरात दहा हजारांहून अधिक स्क्रीनवर ‘केजीएफ 2’ प्रदर्शित झाला. रॉकीभाई अर्थात यशच्या एंट्रीला थिएटरमध्ये टाळ्या, शिट्टय़ांची दाद प्रेक्षकांकडून मिळतेय. संजय दत्तने साकारलेला खतरनाक ‘अधीरा’ देखील भाव खाऊन जात आहे. जोडून आलेल्या सुट्टय़ांचा या चित्रपटाला मोठा फायदा होईल.
आमीर खानचा ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ आणि हृतिकच्या ‘वॉर’ या चित्रपटाला पछाडत ‘केजीएफ 2’ च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 53.95 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ला 50.75 कोटी रुपयांची तर ‘वॉर’ला 51.60 कोटी रुपयांची ओपनिंग मिळाली होती. तर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या केजीएफने पहिल्या दिवशी 44 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.
केजीएफ 2 ला 134.50 कोटी रुपयांची ओपनिंग, पहिल्या दिवशी निर्मितीखर्च वसूल केला आहे.