तिरुअनंतपूरम : तालिबानने अफगणिस्थानवर कब्जा केल्यावर अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधानांचे आभार देखील मानले आहेत.
विजयन यांनी एका ट्वीटमध्ये मंत्रालय आणि मोदींचे आभार मानले आणि सांगितले की, केरळमधील अफगणिस्थानच्या नागरिकांना मदतीची आवश्यकता होती. पंतप्रधानांनी निर्माण केलेल्या यंत्रणेमुळे ही मदत त्यांना मिळू शकली.
विजयन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळवासियांसह भारतीय नागरिकांना अफगणिस्थानमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि परत आणण्यासाठी केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. सर्व भारतीयांना सुरक्षित आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. केरळवासीयांना मदतीची आवश्यकता असल्यास ते स्पेशल अफगाणिस्तान सेलशी संपर्क साधू शकतात.
भारताने रविवारी तीन वेगवेगळ्या उड्डाणांमध्ये ३२९ नागरिक आणि दोन अफगाण अध्यक्षांसह सुमारे ४०० लोकांना परत आणले. १०७ भारतीय आणि २३ अफगाण शीख आणि हिंदूंसह एकूण १६८ लोकांना भारतीय हवाई दलाच्या सी – १७ हेवी-लिफ्ट मिलिटरी ट्रान्सपोर्ट विमानात दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर नेण्यात आले. भारताने अमेरिका, कतार, ताजिकिस्तान आणि इतर अनेक मित्र देशांशी समन्वय साधून निर्वासन मोहिमा पार पाडल्या.