कझाकिस्तान : इंधन दरवाढीच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनांमुळे कजाकिस्तानातील सरकारने राजीनामा दिला आहे. कझाकिस्तानचे राष्ट्रपती कसीम-जोमार्ट तोकायेव यांनी बुधवारी सत्ताधाऱ्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. सध्या अलीखान समाईलोव यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याचबरोबर देशात ५ जानेवारी ते १९ जानेवारीपर्यंत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
आंदोलनकर्त्यांना आटोक्यात आणण्यासाठी, पोलिसांनी लाठीमार केला तर अनेक ठिकाणी अश्रूधूरही सोडण्यात आला आहे. रविवार पासून सुरू झालेल्या या आंदोलनात कझाकिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आठ पोलीस अधिकारी आणि नॅशनल गार्डचे काही सदस्य ठार झाले तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. यावेळी नागरिकांच्या जीवितहानीची कोणतीही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
हेही वाचा ! रयत शिक्षण संस्था यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागा
या देशात तेलाचे साठे आणि खनिज संपत्ती असूनही या देशाच्या काही भागात लोकांना अत्यंत गरीबीत जगावे लागत आहे. सरकारनं नव्या वर्षापासून इंधनावरील नियंत्रण अचानक मागं घेतलं आणि त्यातून ‘एलपीजी’चे दर दुप्पट झाले आहेत.
सरकारच्या या निर्णयानंतर रविवारपासून इथं आंदोलनांचा भडका उडाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये सरकारविरुद्ध असंतोष आहे. १९९१ मध्ये सोव्हिएत युनियनपासून वेगळे झाल्यानंतर कझाकिस्तानमध्ये एकाच पक्षाची सत्ता आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये असंतोषही आहे.