जुन्नर / शिवाजी लोखंडे: आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा जुन्नर आयोजित शिक्षक समिती वर्धापन दिन कार्यक्रम प्रभाकर संझगिरी स्मृती भवन येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्य प्रवक्ते आबासाहेब शिंपी, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष मानसिंग वाकडे, शिरूर पतसंस्थेचे माजी सभापती संभाजी फराटे यांच्या उपस्थितीत जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापन दिन संपन्न झाला.
मान्यवरांच्या हस्ते शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष भावा शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मार्गदर्शन करताना उदय शिंदे म्हणाले, बदल्या झाल्या पाहिजेत ही भूमिका शिक्षक समितीची नेहमी राहिलेली आहे. बदल्या होताना विस्थापित आणि एकल शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे. अशी समितीने ग्रामविकास विभागात आणि ग्रामविकास मंत्री यांच्याकडे भूमीका मांडली आहे. समितीने मंत्रालयामध्ये ठामपणे सांगितले की बदल्या झाल्या पाहिजेत आणि दुर्गम भागात अडकलेल्या माझ्या महिला भगिनींना न्याय मिळाला पाहिजे.
तसेच पुढे बोलताना शिंदे म्हणाले, 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. त्यासाठी शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये शिक्षक समिती एक चळवळ उभी करत आहे. त्या चळवळीच्या माध्यमातून केंद्र सरकार पासून तर पंचायत समिती पर्यंत सर्वच्या सर्व प्रश्न सोडवले जातील. जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी समितीने अनेक आंदोलने केली. या एकाच प्रश्नावर हिवाळी अधिवेशनावर नागपूरला पाच किलोमीटरचा भव्य मोर्चा शिक्षक समितीने काढला होता. शिक्षण सेवकांना मानधन वाढीसाठी शिक्षक समिती सतत मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करत असते. त्याचं फलित म्हणून शिक्षण सेवक मानधनवाढीची फाईल आज मंत्रालय पातळीवर तयार आहे. काही दिवसांमध्ये शिक्षण सेवक मानधनात वाढ होईल, असेही शिंदे म्हणाले.
जानेवारी 2016 मधील ज्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू आहे, त्यात त्रुटी आहे. त्यासाठी पाठपुरावा चालू आहे. बक्षी समितीने खंड 2 राज्य शासनाला सादर केला आहे. परंतु अजून पर्यंत राज्य शासनाने तो प्रकाशित केला नसल्यामुळे त्यामध्ये ही तफावत आढळते. निश्चितपणे खंड दोन प्रकाशित करण्यासाठी पाठपुरावा चालू आहे. निश्चितपणे त्याला न्याय मिळून जानेवारी 2016 मध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी लागू आहे, त्यांना त्याचा फायदा होईल असेही शिंदे म्हणाले.
यावेळी जुन्नर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांनी प्रास्ताविकामध्ये 7 जुलै 2012 पासून जुन्नर मध्ये सुरू झालेल्या जुन्नर शाखेची यशस्वी घोडदौड, आजपर्यंत केलेले उल्लेखनीय कार्याचा आढावा मांडला.
समितीची वाढविण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्याचे आता वटवृक्षात झालेले रूपांतर झाले आहे, असेही लांघी म्हणाले. यावेळी विठ्ठल जोशी यांनी PPT द्वारे समितीने आतापर्यंत केलेले कार्य मान्यवरांना दाखविण्यात आले.
यावेळी शिक्षकांच्या मागण्या शिक्षक नेते नामदेव मुंढे व महिला प्रतिनिधी जयश्री गारे यांनी मांडल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल जोशी यांनी केले व आभार महिला अध्यक्ष श्रीमती जिजा साबळे यांनी मानले.