जुन्नर : किल्ले शिवनेरीच्या उत्तरेला उभारण्यात आलेल्या पदपथावरील (पथदिवे) दिवे गेल्या महिन्यापासून बंद पडले आहेत. या परिसरात पहाटे व सायंकाळी नागरिक तसेच वृद्ध मोठ्या संख्येने पायी फिरायला जात असतात. विशेषतः यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते. या बंद पडलेल्या दिव्यांबाबत नागरिकांनी नगरपालिका, विद्युत महामंडळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता समाधानकारक उत्तर मिळत नसून शासकीय खात्यांच्या ढकलाढकलीचा उत्तम नमुना यानिमित्त जुन्नरकरांना अनुभवयास मिळत आहे.
या पथपदाची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली होती. त्यावरील दिव्यांचे काम त्यांच्याच विभागाच्या पुणे स्थित वीज विभागाने केली होती. मात्र या प्रकल्पाचे हस्तांतरण जुन्नर नगरपालिकेकडे केले नसल्याचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले. त्यामुळे या बंद पडलेल्या दिव्यांची दुरुस्ती किंवा इतर मेंटेनन्स कोणी करायचा यावरून ढकलाढकली सुरू आहे. विशेष बाब म्हणजे सदर पथदिव्यांचे वीजबिल पालिकेकडून नियमितपणे भरले जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता चंद्रकांत तोटावर यांना विचाराना केली असता त्यांनी पुणे येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले. तेथील वीज विभागाचे अधिकारी जकाते, टोपले आदींना विचारणा केली असता माहिती घेतो, माझी बदली झालीये किंवा मी नुकताच आलोय, अशी उत्तरे नागरिकांना मिळत आहेत.
या प्रकल्पाबाबत अधिक माहिती घेतली असता या प्रकल्पाचे पीडब्ल्यूडीने पालिकेकडे हस्तांतरण केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांनी याबाबतचे एक पत्र पालिकेकडे इनवर्ड केले होते. त्यास पालिकेने सदर दिव्यांची पाहणी केल्यावर हस्तांतरण करावे, असे कळविले होते. तर पीडब्ल्यूडीने हा प्रकल्प पालिकेच्या ताब्यात दिला असून त्यांनी देखभाल दुरुस्ती करावी, असे म्हंटले आहे. शासनाच्या विविध योजनांमध्ये पथदिव्यांसाठी मोठ्या निधीची तरतुद केली जाते, मात्र त्याची देखभाल, वीजबिले यासाठी निधी किंवा जबाबदारी निश्चित न केल्यामुळे अनेक पथदिवे बंद असल्याचे ठिकठिकाणी दिसत आहे.
दरम्यान २०१८ साली तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांनी या पाथवेची उभारणी केली होती. सुमारे ३.५ कोटी रुपये निधींच्या या कामात भुयारी गटार, त्यावरील पदपथ, जुन्या धाटणीचे ९० पथदिवे आदींचा समावेश होता. या किल्ले शिवनेरीच्या पायथा परिसरात पंचलिंग मंदिर, शिवसृष्टी, वरसुबाई माता तसेच हरीण टेकडी आदी असल्यामुळे शिवभक्त, भाविक, पर्यटक तसेच फिरायला जाणारे नागरिक हजारोंच्या संख्येने येत असतात. या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन दागिने हिसकविण्याच्या काही घटना घडल्या असून टवाळखोर मुलांकडून येथे येणाऱ्या महिलांना त्रास देण्याच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी यातील काही दिव्यांची समाजकंटकांनी तोडफोड केली होती. सदर दिवे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.