Wednesday, February 5, 2025

जुन्नर : मनरेगातून साकारतोय आदिवासी गावांचा विकास !

जुन्नर : जिल्हा परिषद मनरेगा विभाग आणि पंचायत समिती जुन्नर यांच्या मनरेगा योजनेतून किसान सभेच्या लोकजागृतीमुळे जुन्नर तालुक्यातील आदिवासी गावाचा विकास साकारतोय.

गेल्या वर्षभरापासून मनरेगा योजनांतून ग्रामीण भागात हातविज, आंबे -पिपरवाडी, इंगळुन, चावंड -माणकेश्वर, पूर, शिरोली, उसराण, अंजनावळे, खैरे-खटकाळे, हडसर या गावांमध्ये गेल्या वर्षभरापासून वृक्ष लागवड, संगोपन आणि मनरेगाच्या इतर योजनांतून गाव विकासाला चालना मिळत आहे. मनरेगातून गावाचा गाव विकास आणि गावामधील लोकांना हक्काचा रोजगार मिळत आहे.

या गावांमध्ये 90 पेक्षा जास्त मजुरांना हाताला काम आणि दिवसाची 248 रुपये हक्काची मजुरी मिळत आहे. परंतु मजूरी 500 रुपये मिळावे, यासाठी अखिल भारतीय किसान सभेचा लढा चालू असल्याचे किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी सांगितले.

आंबे पिपरवाडी येथे वृक्ष संगोपनाबरोबरच 4 पाणंद रस्ते तयार करण्यात आले आहेत. तसेच इंगळुन गावामध्ये वृक्ष संगोपनाचे काम सुरू आहे. हे काम पाहून गावातील नोकरदार वर्गाने वर्गणी काढून झाडांना संरक्षण जाळी दिल्या. 

खटकाळे – खैरे गावाने रोजगार हमीच्या कामात एक आदर्श काम केले आहे. त्याचाच भाग म्हणजे सर्व मजुरांनी स्वखर्चाने रोजगार हमी योजनेचे शर्ट छापून घेतले. यात ग्राम रोजगार सेवक सचिन मोरे यांचे मोठे योगदान आहे. या गावामध्ये 1600 झाडे रोजगार हमी योजनेतून लागवड केली आहे ती सर्वांच्या सर्व झाडे जगली आहेत.

हडसर गावामध्ये गेल्या वर्षी 800 झाडाची लागवड करण्यात आली त्याचे संगोपनाचे काम तेथील 4 गरीब विधवा महिलांना देण्यात आले. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील उदरनिर्वाह करण्यासाठी एक हक्काचा रोजगार मिळाला असल्याचेही त्या म्हणाल्या.

“मनरेगा योजना’ ग्रामीण आदिवासी भागाला संजिवनी देणारी असून उर्वरित गावात मनरेगाची कामे सुरू करण्याचा मानस असल्याचे किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे यांनी सांगितले.

रोजगार हमी योजना वरदान ठरत असताना त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. गावागावातील पायाभूत सुविधांची निर्मिती आणि महिला सक्षमीकरण, आणि रोजगार यामुळे गावाचा विकास आणि गावातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल जाईल, अशी आशा आहे, असेही लक्ष्मण जोशी म्हणाले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles