Thursday, December 12, 2024
Homeजुन्नरजुन्नरला जबाबदार पर्यटन कार्यशाळा संपन्न

जुन्नरला जबाबदार पर्यटन कार्यशाळा संपन्न

जुन्नर / आनंद कांबळे : ओझर, ता. जुन्नर येथे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व पर्यटन संचालनालय पुणे विभाग यांच्या वतीने जुन्नर जबाबदार पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्याच्या हेतूने जिल्हा पर्यटन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख व पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या कार्यशाळेमध्ये जुन्नर मधील ज्या गावांमध्ये धार्मिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, कृषी व वनपर्यटन स्थळे आहेत, त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, देवस्थानचे ट्रस्टी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक वन समिती अध्यक्ष, हॉटेल व्यवसायिक, कृषी पर्यटन केंद्र चालक, महाविद्यालयाचे प्रतिनिधी व पर्यटनाशी निगडीत व्यक्ती आणि संस्थांना निमंत्रित केले होते.

यावेळी उपस्थितांमधून पर्यटनाविषयी च्या सूचना व माहिती लिखित स्वरूपात भरून घेण्यात आली. पर्यटन विकासाचा आराखडा तयार करताना या सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.

जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी एकत्रितपणे काम करणार असल्याची भावना विद्यमान आमदार अतुल बेनके व माजी आमदार शरद सोनवणे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

याप्रसंगी पुणे जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा कसा असेल याचे सादरीकरण जिल्हा पर्यटन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केले. व जुन्नर तालुक्यातील जबाबदार पर्यटन चळवळ पुणे जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरेल असे ते म्हणाले.

यापुढील काळात गाईड प्रशिक्षण व पर्यटन महोत्सव आयोजित करण्यासाठी पर्यटन विभाग पुढाकार घेईल असे मत पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर यांनी व्यक्त केले.

जुन्नर तालुक्यात निवास – न्याहरी योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसीचे दीपक हरणे म्हणाले.

तसेच जुन्नर तालुक्यात पर्यटन स्थळांचे दिशादर्शक फलक तसेच पर्यटनातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पंचायत समिती पुढाकार घेईल, असे गटविकास अधिकारी पंचायत समिती, जुन्नरचे शरदचंद्र माळी म्हणाले.

जुन्नर तालुक्यातील कृषी पर्यटन विकासासाठी कृषी विभाग सकारात्मक प्रयत्न करेल, असे तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ म्हणाले.

“जुन्नर तालुक्यातील बरीचशी पर्यटन स्थळे ही वनक्षेत्रात येत असून वनविभाग पर्यटन विकासासाठी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करेल,” असे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे म्हणाले.

याप्रसंगी जुन्नर पर्यटनातील अनुभवी व तज्ञ मंडळींनी जुन्नरची खाद्यसंस्कृती, इतिहास, किल्ले, लेणी, धार्मिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, साहस पर्यटन व वैज्ञानिक पर्यटन या विषयांवर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी जुन्नर जबाबदार पर्यटन चळवळीत विशेष कार्य केल्याबद्दल गुळुंचवाडी, बोरी बुद्रुक व खुर्द, ओतूर, आंबोली व घाटघर या ग्रामपंचायतींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा पर्यटन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग अस्मिता मोरे, प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसी दीपक हरणे, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, जिल्हा नियोजन समिती सदस्य माऊली खंडागळे, विकास दरेकर, जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, नायब तहसीलदार सचिन मुंढे, श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर चे अध्यक्ष गणेश कवडे, श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट चे सचिव जितेंद्र बिडवई, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक मनोज हडवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

जुन्नर तालुक्यातील पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांना एकत्र घेऊन जुन्नर जबाबदार पर्यटनाचे शास्वत मॉडेल विकसित करण्याचा मानस असल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता वामन यांनी केले तर आभार प्रदर्शन जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे यांनी केले.


संबंधित लेख

लोकप्रिय