नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 19 ऑगस्टपासून ती बेपत्ता होती. शनिवारी घराजवळील विहिरीत तिचा मृतदेह आढळला.
नेहा अमोल पवार (वय २२) असे या विवाहितेचे नाव असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा नवरा, सासू, सासरे, दीर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेचा नवरा अमोल अनंथा पवार, सासरे अनंथा हरिभाऊ पवार, सासू कमल अनंथा पवार, दीर प्रवीण अनंथा पवार, जाऊ निर्मला प्रवीण पवार, सुप्रिया नितीन पवार, चुलत सासरे भिकाजी हरिभाऊ पवार ( सर्व रा . वडगाव कांदळी ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.
नारायणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मार्च २०२० मध्ये वडगाव कांदळी येथील संदीप वसंत पाचपुते यांची मुलगी नेहा व अमोल पवार यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर आरोपींनी नेहा हिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. १९ ऑगस्टपासून नेहा घरातून बेपत्ता होती. शनिवारी ( २१ ऑगस्ट ) तिचा मृतदेह त्यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत आढळून आला. या प्रकरणी नेहाचे वडील संदीप पाचपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नारायणगाव पोलिस करीत आहेत.