Tuesday, January 21, 2025

जुन्नर : लग्नसोहळ्यातील २३ वहाडी कोरोना पॉझिटिव्ह

जुन्नर (पुुणे) : धोंडकरवाडी – निमदरी (ता . जुन्नर) येथील एका लग्न सोहळ्यास उपस्थित वहाडी मंडळी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे लग्न सोहळे पुन्हा चर्चेत आले आहे.

लग्न सोहळ्यांंना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना सरपंच, पोलीस पाटील आणि पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. धोंडकरवाडी येथे नुकताच पार पडलेल्या घरगुती लग्नसोहळ्यात ही घटना घडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

नवरदेव तसेच घरातील नातेवाईक, पाहुणे मंडळींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेस येणेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. कोरोना संशयित असलेली या घरातील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्याला आवश्यक असणारी परवानगी घेतली असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा विवाह सोहळा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरीच संपन्न झाला.

लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायण महापूजा देखील झाली. या निमिताने पाहुणे मंडळींनी हजेरी लागली होती. लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेव मुंबईला देखील जाऊन आला होता. त्यानंतर त्यास त्रास होऊ लागल्याने कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आल्यामुळे लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्या संपर्कातील सुमारे ४० नातेवाईकांची कोरोना चाचणी लेण्याद्री येथे करण्यात आली. यात १३ जण पॉझिटिव्ह निघाले. तर खासगी प्रयोगशाळेच्या तपासणीत सुमारे १० जण पॉझिटिव्ह निघाले असे एकूण २३ जण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. 

घरगुती पध्दतीने लग्न सोहळा झाला असला तरी मास्क व सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर याबाबत फारशी काळजी न घेतल्याने एवढी मोठी रुग्ण संख्या वाढल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. 

शहरात कोरोना नियंत्रित, पण ग्रामीणचे काय ?

पुणे जिल्ह्यात शहरी भागातील कोरोना नियंत्रणात आला आहे. परंतु ग्रामीण भागातील संख्या अजूनही आटोक्यात येताना दिसत नाही. कोरोना नियंत्रण समिती, सरपंच, पोलीस यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे यावरून दिसत आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles