सातारा : महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचा मुलगा आदित्यराज गोरे याने सातारा-कोल्हापूर रस्त्यावर केलेल्या धोकादायक बाईक स्टंट्सची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या स्टंट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामुळे आदित्यराजवर टीकेची झोड उठली आहे. विशेष म्हणजे या बाईकला नंबर प्लेटही नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आदित्यराज हा जीवघेणे स्टंट करताना दिसत आहे. हे स्टंट त्याने स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरून लाइव्ह शेअर केले होते, ज्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप होत आहे. या घटनेने स्वतःच्या आणि इतरांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे. सामाजिक कार्यकर्ते भैय्या पाटील यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या मुलासाठी महाराष्ट्रात वेगळे नियम आणि कायदे आहेत का?” असा सवाल उपस्थित केला आहे. (हेही वाचा – मोठी बातमी : 1 एप्रिलपासून वीज दर कमी होणार, सामान्यांना मिळणार दिलासा)
भैय्या पाटील यांनी पुढे म्हटले की, “सामान्य व्यक्तीने असे कृत्य केले तर त्याची गाडी जप्त होऊन मोठा दंड किंवा तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाते. मग मंत्र्याच्या मुलाला अशी मोकळीक का?” या टीकेनंतर आदित्यराजने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून हे व्हिडिओ हटवले असले, तरी या प्रकरणाची चर्चा थांबलेली नाही. (हेही वाचा – मोठी बातमी : व्लादिमीर पुतिन यांच्या आलिशान कारमध्ये मोठा स्फोट)
मोटर वाहन कायदा, १९८८ अंतर्गत अशा धोकादायक स्टंट्ससाठी दंड आणि शिक्षेची तरतूद असली, तरी या प्रकरणात अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्याची माहिती उपलब्ध नाही. प्रभावशाली व्यक्तींच्या बाबतीत कायद्याची अंमलबजावणी कशी होते, यावरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (हेही वाचा – पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज)
या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून, जयकुमार गोरे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आणि कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा – शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजित पवारांचे मोठे विधान)