Thursday, December 12, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य : कथा - अनुत्तरित सारे..! - श्रुती घोडेकर

जनभूमी साहित्य : कथा – अनुत्तरित सारे..! – श्रुती घोडेकर

अनुत्तरीत सारे..!

      बरं झालं त्या दिवशी तिची आणि माझी भेट झाली.इतक्या वर्षांनंतर ती भेटली. तो आनंद काही वेगळाच होता.ती म्हणजे माझी जिवलग मैत्रीण तन्वी.

आम्हां दोघींनाही एकमेकींना भेटण्याची खूप इच्छा होती.पण भेट मात्र त्या दिवशी झाली. तो दिवस खरंच खूप छान होता. इतक्या वर्षांनंतर ची भेट म्हंटल्यावर आम्ही गप्पा ही खूप मारल्या.पण गप्पांच्या सुरुवातीलाच तिची नजर माझ्या घरातल्या एका पेंटिंगवर गेली. आणि नेहमीप्रमाणे तिनेही मला तोच प्रश्न विचारला. माझ्यासाठी तो प्रश्न काही वेगळा नव्हता.कारण घरात येणारी प्रत्येक व्यक्ती त्या पेंटिंगकडे कुतूहलाने पाहून मला हसत प्रश्न विचारायची, ‘या पेंटिंगवर नाव आहे,तारीख आहे,पण कागद मात्र कोराच आहे.असं का? या कागदावर काहीच कसं रेखाटलेले नाही?’

मग काय, तिच्या आग्रहाखातर मी ही तिला सांगायला सुरुवात केली.’ मधल्या काळात ऑफिस मधल्या एका मैत्रिणीने मला घरी बोलावलं होत.मी विचारलं तर म्हणाली सहजच मग मी ही जायचं ठरवलं.आणि तशीही त्या दिवशी ऑफिसला सुट्टी पण होती.ठरल्याप्रमाणे मी तिच्या घरी पोहोचले.तिच्या घराबाहेर खूप मोठा बगिचा,तिथेच एक छोटासा चोपळा.मला तर ती बाग पाहताच आवडली होती आणि तितक्यात ती बाहेर आली.

तिचा चेहरा खूप आनंदी दिसत होता.घरही खूप छान, अगदी कोणालाही आवडेल असं होत.एका बाजूला बोन्सायच छोटंसं झाड तर दुसरीकडे आखिव- रेखीव वस्तू आणि बरंच काही. सार काही छान होत.मग तिने मला तिची खोली दाखवली.ती बोलतच राहिली पण मी मात्र क्षणभर थांबून सार काही न्याहळून पाहत होते. त्याला कारणही तसंच होत.

तिच्या संपूर्ण खोलीत तिने काढलेल्या खूप साऱ्या पेंटिंग होत्या, आणि त्या ही अगदी सुंदर.तिच्या प्रत्येक चित्रात ना वेगळेपण जाणवत होत. ‘दिवसभरातील एखादा आठवणीत राहील असा क्षण मी चित्रात रेखाटत असते.’असं त्यावेळी तिने मला सांगितल होतं. हे सगळं ऐकून,पाहून मला तर खूप छान वाटत होत.पण फारशी ओळख नसताना फक्त ऑफिसमधील मैत्रीण म्हणून तिने मला घरी बोलवावं.हेही थोडं नवल वाटण्यासारखं होतं.

दिवसभर खूप साऱ्या गप्पा मारल्यावर,निघताना ती मला म्हणाली,’तुला आवडली आहे तर एखादी पेंटिंग तू घेऊन जा.’पण खरं तर तिच्या आयुष्यातले आठवणीत राहणारे काही क्षण तिने त्या चित्रांमध्ये रेखाटले होते.हे तिनेच मला सांगितले होत.म्हणून मीच गमतीने तिला म्हणाले,’त्यापेक्षा तुला आवडणारं एखाद पेटिंग मला दे,तुझी आठवण म्हणून..!’ आणि क्षणाचाही विलंब न लावता तिने मला एक पेटिंग दाखवली. मला तर हसू आलं,कारण तो फक्त एक कोरा कागद होता.मी काही बोलणार तेवढ्यात तिने त्या कागदावर त्या दिवसाची तारीख व तिची सही केली आणि ‘माझी सगळ्यात आवडती पेटिंग आहे,जपून ठेव.’ असं ती मला म्हणाली.मला काही सुचेनाच,त्यावेळी काही न बोलता मी घरी परतले.पण आजपर्यंत मीही तिला याचं कारण विचारलं नाही.बस..! म्हणून ती पेंटिंग मी जपून ठेवली आहे.’

हे सगळं सांगून झाल्यावर तन्वी मला म्हणाली,’तूच का नाही त्या कोऱ्या कागदावर एखाद चित्र काढलस ?’ खरं तर तन्वीच्या म्हणण्याप्रमाणे माझ्याही मनात असं खूपदा आलं.पण त्या दिवशी माझी व तिची झालेली भेट आयुष्यभर लक्षात राहणारी असूनही मी चित्र नाही रेखाटू शकले. ‘कदाचित तीही रेखाटू शकली नसेल.’असं तन्वी मला म्हणाली.मग मीही म्हणाली असेलही.पण का कुणास ठाऊक फारशी ओळख नसताना त्याचदिवशी तिने मला घरी बोलण्याचं कारण ? संपूर्ण दिवस माझ्याशी अगदी मनसोक्त गप्पा मारून,जाताना मला अशी एखादी पेंटिंग देण्यामागच कारण ? आणि विशेष म्हणजे,’ ही माझी सगळ्यात आवडती पेंटिंग आहे,जपून ठेव.’असं म्हणण्यामागच कारण ? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आजही माझ्यासाठी अनुत्तरीतच.

लेखिका – श्रुती घोडेकर

संपर्क – 9356299428

पत्ता – गंगापूर ता.आंबेगाव जि. पुणे 

संबंधित लेख

लोकप्रिय