Monday, March 17, 2025

The desert : सावधान वाळवंट सरकत आहे

यावत्‌ भूमंडलात धत्रे, सशैल वन काननम्‌ (The desert)
तावत्‌ तिष्ठंती मेदिन्याम्‌, संतती पुत्र पौतृकी।।


हजारो वर्षापूर्व आमच्या दूरदर्शी पुर्वजांनी आम्हाला बजावून सांगीतले होते की जोपर्यत या पृथ्वीवर हिरवळ, झाडे, पर्वत आणि मुबलक पाणी आहे तोपर्यतच तुमची मुले बाळे सुखात जगतील, पण वर्तमान स्थिती पाहता नव्या शतकांत आपल्याला दुषित पर्यावरणामुळे निर्माण होणाऱ्या भयानक आपत्ती विरुद्ध झुंजावे लागणार आहे. (The desert)

वास्तविक मानवाचे निसर्गाशी असलेलं नातं अतुट आहे. ज्या निसर्गाच्या उन सावलीत आमच्या अनेक संस्कृतींनी जन्म घेतला, त्यांचा उत्कर्ष झाला असा हा निसर्ग आम्हाला गुरू समान आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी व आकाश या तत्वांनी बनलेल्या या निसर्गशक्ती पासून आम्ही अनेक शास्त्रे शिकलो आहोत, तरी पण आम्ही कळत न कळत या निसर्गावर आघात करीत आहोत. (The desert)

सृष्टीचे कार्य चेतनामय पंचतत्वांच्या सहाय्याने एका संथलयीत, ठराविक दिशेने अविरत सुरू असते. निसर्ग आपले कार्य सहजपणे करीत असतो. निसर्गाच्या छायेत सर्व जीव, जंतू, पशूपक्षी, वृक्षवेली सुखासमाधानाने नांदत आहेत. जीवसृष्टीतील अनेक संस्कृती स्वत:ची आगळी वेगळी वैशिष्ट्ये कायम ठेवून कालक्रमणा करीत आहेत. सर्व जीवाचं पोषण व नाश निसर्ग स्वत:च्या नियमाने संतत आणि सहज करीत असतो. हेच सृष्टीचं जीवनचक्र आहे. संपूर्ण जीवसृष्टी निसर्गाच्या पाच तत्वांच्या जादुई चेतनामय आवरणात सुरक्षित आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक जीव, वस्तू, चल, अचल स्वत:च्याच आवरणात बद्ध असतात. शरीरात वाहणारं रक्त रक्तवाहिनीच्या आवरणात वाहतं तेव्हाच ते सुरक्षित असतं. ग्रंथी, हाडे, मांसपेशी यांना त्वचेचे आवरण लाभलं आहे. मेंदू नावाचं चमत्कारी यंत्र कवटीच्या आवरणातच सुरक्षित आहे. केसांचे आवरण बदलत्या हवामानापासून जीवाचं रक्षण करतं. प्रत्येक वस्तू, झाडे, पशूपक्षी, जलचर हे सर्व स्वत:च्या तसेच पंचमहाभूतांच्या पाच तत्वांच्या आवरणातच सुरक्षित असतात. (The desert)



जोपर्यत पंचतत्वांचा आपसांत समतोल आहे, तोपर्यंतच निसर्ग शांत आहे. निसर्गाच्या शांत व उबदार आवरणात ही जीवसृष्टी आरामात जगणार आहे. पण जर हा समतोल बिघडला तर? तर विनाश अटळ आहे आणि या विनाशाला जबाबदार असणार आहे मानव. वसाहत, व्यापार व शेतीकरीता घनदाट जंगलाचा सतत नाश होत गेला, या कृतीचे फळ भविष्यात मिiणारच आहे. व्यापार व शिकारीच्या उन्मादात मानवाने अनेक प्राण्यांचे वंश नष्ट केले. शेतातून जास्त पीक घेण्याच्या हव्यासापाई निरनिराळी विषारी रसायने वापरणे सुरू केले. परिणामत: जमीनीत राहणारी जीव संस्कृती, जी शेतात वावरून जमीनीचा कस वाढवते, नष्ट होत आहे. विषारी रसायने तथा फवारणीपुढे हे जीव कसे टिकणार? कारखान्यातील दुषित पाणी नाल्यात, नदीत किंवा समुद्रात सोडल्यामुळे पाण्याच्या आवरणात सुरक्षित असलेले जीव तडफडून नष्ट होत आहेत.

आजच्या प्रगत युगात जगभरातील मानवाजवळ असंख्य योजना, इच्छा आहेत. त्याला अधिकार व संपत्ती हवी आहे. विज्ञानाद्वारे प्रगत व समृद्ध बनून विकास साधावयाचा आहे. सत्तास्पर्धेत अग्रेसर रहावयाचे आहे. खरे तर निसर्गाच्या लेखी मानव म्हणजे अनंत ब्रम्हांडातील पृथ्वी नामक ग्रहावरील केवळ एक जीव. मानवी संस्कृतीचं आयुष्य म्हणजे या सृष्टीच्या आयुष्याच्या मानाने एक छोटासा काळ! असे कित्येक काळ या ब्रम्हांडात येऊन गेले असतील. कित्येक मानवी संस्कृती काळाच्या ओघात निसर्गाच्या जडण घडणीच्या प्रक्रियेत नष्ट झाल्या.

सृष्टीने निर्माण केलेला प्रत्येक जीव हा दुसऱ्या कुणा जीवाची अन्नाची सोय आहे. त्या द्वारेच प्रत्येक घटकाचं संतूलन साधलं जातं. मानवेतर अन्य जीव एकमेकांवर हल्ला करतात. तो मुख्यत्वे पोटासाठी व कधीकधी श्रेष्ठत्वासाठी, पण त्यावेळी कधीही निसर्गहानी होत नाही. संथ जलाशयात दगड पडल्यास थोडी खळबळ व्हावी एवढाच त्या घटनेचा ठसा राहतो व पुन्हा सृष्टी चं कार्य शांतपणे सुरू होते.

नित्य घडणाऱ्या या घटना निसर्गनियमानुसार सृष्टीच्या जिवनचक्राचाच एक भाग आहेत. पण मानव एकमेकांवर हल्ला करतो तो स्वार्थासाठी. दुसऱ्यावर अधिपत्य गाजवून जमीन, संपत्तीची वाढ करतांना शत्रूच्या संपत्तीची राख रांगोळी तो मुद्दाम करीत असतो. आपल्याच मानव वंशाचा नाश तो इतक्या क्रुरतेने, कुटीलतेने, विश्वासघाताने करत असतो की बुद्धीचा एवढा दुरूपयोग सृष्टीतील कोणताही जीव कधी करत नसावा. नासधूस केलेल्या प्रदेशात निसर्गनियमाचे उल्लंघन होऊन ऋतूमानात अवेळी अकारण बदल होत आहेत.

क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रांचे हल्ले, भूगर्भातील चाचण्या, आसमंतात पसरणारा कारखान्यातील विषारी रासायनिक धूर, कोळसा, पेट्रोल, डिझेल इंधनाच्या अती वापरामुळे वातावरणात साठणारा कार्बन डॉय ऑक्साईड, पाण्यात सोडले जाणारे विषारी रसायने, अणू कचरा, ध्वनी प्रदूषण आणि या सगल्यांच मूळ असणारी दर क्षणाला वेगाने वाढणारी मानवप्रजा, या अनेक कारणांनी या सुंदर सृष्टी चा नुसता उकीरडा होऊ लागला आहे. दर क्षणाला वातावरणात सोडला जाणारा कार्बन अनेक वर्षे टिकून राहतो. सूर्याची उष्णता स्वत:मधे सामावून घेतो.

परिणामत: दिवसेंदिवस पृथ्वीभोवतीचे तापमान वाढत चालले आहे त्यामुळे भविष्यात दोन्ही गोलार्धावरील बर्फ वितळुन समुद्राची पातळी वाढेल. या कारणाने पृथ्वीवर काय हाहाकार होईल ? पृथ्वीवरील सध्याचे जमीन व पाणी यांचे प्रमाण बिघडेल. पाण्याची पातळी वाढल्याने बरीच जमीन पाण्याखाली जाईल. आपल्या पृथ्वीभोवती बाह्य वातावरणापासून रक्षण करण्याकरीता “ओझोन’ नामक वायुचे सरंक्षक कवच जागोजागी क्षतीग्रस्त होत आहे. त्याची जाडी कमी होत आहे. ओझोन शिवाय पृथ्वीवर पोहोचणारे सूर्यकिरण अतोनात दाहक असतील त्यामुळे त्वचेच्या केंन्सर सारखे रोग होतील. त्या उष्ण किरणांपुढे कित्येक जीवसंस्कृतींचा टिकाव न लागून त्या नष्ट होण्याची भिती आहे. (The desert)

विकसीत देशात प्रगत विज्ञानाद्वारे सर्व सुखसोईंचा मनमुराद उपभोग घेणारे पृथ्वीच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 15 ते 20 टक्के लोक आहेत. पण जगभरात असलेली 80 ते 85 टक्के मानवजमात भूक, अपमृत्यू, अंधश्रद्धा, बेकारी, गरीबी, लाचारी, कुपोषण, प्रदुषणामुळे होणारी रोगराई अशा समस्यांमधे जखडली असून त्यांना प्रगत ज्ञानाचा उपभोग घेणे अशक्य आहे. तेव्हा एकीकडे मुठभर श्रीमंतांचे चैन चोचले पुरवण्यासाठी निसर्ग संपत्तीची प्रचंड लयलूट, तर दुसरीकडे कोट्यावधी जनतेच्या मुलभूत गरजासुद्धा भागवता येत नाहीत, हे कितपत योग्य आहे वैयक्तिक स्वार्थ, अहंकार, जात, धर्म, देश, संपत्ती या सर्वापेक्षा पर्यावरणाचे रक्षण हे प्रथम कर्तव्य असावयास हवे, कारण आपल्या अस्तित्वापुढे सर्व काही नगण्यच आहे.

पर्यावरणाची रक्षा ही बाब प्रत्येकाला समजणे आवश्यक आहे. निसर्गाचा ऱ्हास करणारी व्यक्ति निसर्ग द्रोही समजून अशा व्यक्तिस पृथ्वीचा शत्रू समजावयास हवे. आपल्या अनंत चुकांचा परिणाम म्हणून वाळवंट नामक क्रुर निष्ठूर आपत्ती हळू हळू आपल्याकडे सरकते आहे हे आम्हाला माहित आहे?

सुहास सोहोनी
अमरावती, जलक्रांती अभियान


Related Articles

- Advertisement -

Latest Articles