जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने
जालना, ता. १८ : सिटू संलग्न जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध न्याय मागण्यासाठी व प्रलंबित प्रश्नांसाठी मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच कामगार अधिकारी तथा नोंदणी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, सन २०१७ मध्ये बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान म्हणून रु.५,००० देण्यात आले होते ते २०१९ मध्ये बंद केले. त्याच धर्तीवर यावर्षीही दिवाळी सणासाठी बोनस म्हणून १० हजार रु. द्यावे, कामगारांच्या पाल्यांचे शिष्यवृत्ती व विविध योजनेचे २ वर्षापासून प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावे, करोना काळातील दिलेल्या अर्थसहाय्यापासून वंचित राहिलेल्या कामगारांना त्वरीत अर्थसहाय्य वाटप करावे. ऑनलाईन नोंदणी व नुतनीकरणाचे अर्ज दाखल केल्यानंतर ८ दिवसात तपासणी करून पावत्या व स्मार्ट करण्यात यावे, आदी मागण्या सिटू प्रणीत बांधकाम कामगार राष्ट्रीय फेडरेशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
यावेळी सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉ.मधुकर मोकळे, संघटनेचे कोषाध्यक्ष कॉ.सुभाष मोहिते, ऍड.अनिल मिसाळ, कॉ.शरद ढेरे, कॉ.दीपक शेळके, कॉ. प्रभाकर चोरमारे, शरद डुकरे, अहेमद मिस्त्री, गजानन पातरफळे, सुधाकर कोथळकर, विजय बोर्डे, सर्जेराव बरसाले, बाबासाहेब पाटोळे यांच्यासह मोठ्या संख्येने बांधकाम कामगार आंदोलनात सहभागी होते.