जळगाव : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एक धक्कादायक ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाला (CMO Maharashtra) प्राप्त झाला आहे. या ईमेलमध्ये आयुष प्रसाद यांची डंपरद्वारे हत्या करण्यात येईल, अशी गंभीर धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे ईमेलमध्ये ?
मिळालेल्या माहितीनुसार, हा ईमेल आज सकाळी (१२ एप्रिल २०२५) मुख्यमंत्री कार्यालयात प्राप्त झाला असून, त्यात आयुष प्रसाद यांच्या हत्येचा कट असल्याचा उल्लेख आहे. ईमेलमध्ये लिहिले आहे की, “आयुष प्रसाद यांची डंपरद्वारे हत्या करण्यात येईल आणि जळगाव जिल्ह्यात दंगली घडवून देण्यात येतील. जळगावचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भ्रष्ट असल्याने त्यांना तातडीने निलंबित करा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.” या ईमेलमुळे प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. (हेही वाचा – बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध ; वाचा काय आहेत नवीन अपडेट)
हा ईमेल प्राप्त झाल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने त्याची माहिती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि स्थानिक पोलिसांना पाठवली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा – खासदारानं संसदेत सलग २५ तास भाषण देऊन केला विक्रमी, म्हणाला आपला देश संकटात आहे…)
जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, हा ईमेल सायबर गुन्ह्याच्या स्वरूपाचा असल्याने सायबर सेलमार्फत तपास सुरू करण्यात आला आहे. “आयुष प्रसाद यांना आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांना यापूर्वी तीन ते चार वेळा धमकीचे मेल प्राप्त झाले आहेत. या मेलमधील भाषा पाहता त्याकडे फारसे गांभीर्याने घेण्याचे कारण दिसत नाही, परंतु तरीही आम्ही काळजीपूर्वक तपास करत आहोत. ईमेलचा स्रोत शोधून दोषींवर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा – पशुधन विकास अधिकाऱ्यांची २७९५ पदे भरणार)
राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांना तपास करण्याचे निर्देश देण्यात येतील आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांची सुरक्षा आमच्या प्राधान्यावर आहे.” (हेही वाचा – UPI Down : GPay, PhonePe, Paytm ची सेवा ठप्प; वापरकर्ते हैराण)
कोण आहेत आयुष प्रसाद ? | Ayush Prasad
आयुष प्रसाद हे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत आणि सध्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणूनही काम पाहिले आहे, जिथे त्यांच्या कार्यकाळात विविध विकासात्मक उपक्रम राबवले गेले. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना स्थानिक आणि राज्य पातळीवर ओळख मिळाली आहे. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)