मुंबई : शेतकऱ्यांसाठी एक सुखद बातमी समोर येत आहे. उन्हाळ्यानंतर आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांसह मान्सुनचे लवकर आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने शुक्रवारी आग्नेय बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात आगेकुच केली आहे. त्यामुळे केरळात ४ जुनला पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज आहे.
मान्सून शुक्रवारी अंदमान निकोबारच्या नानकोवरी बेटावर दाखल झाला आहे. 1 जुनला केरळात मॉन्सुन दाखल होण्याची अपेक्षा होती परंतु त्याच्या केरळातील आगमनाला काहीं विलंब होण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचे आणि ढगांचे गणित जुळले तर तो 4 जूनला केरळात आणि 11 जूनला महाराष्ट्रात धडकू शकतो. हा अंदाज वर्तवला असला तरी ४ दिवस अलिकडे पलिकडे होऊ शकतात असं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात मान्सून अंदमान, केरळमार्गे येतो. वास्तविक पोर्टब्लेअर येथे मान्सून धडकण्याची तारीख 21 मे असते. यंदा वेळापत्रक जुळेल असे हवामान तज्ञांचे मत आहे. आता तो नानकोवरी बेटावर असून हे बेट पोर्टब्लेअरपासून 425 किलोमीटरवर आहे. एवढा लांबचा प्रवास तो दोन दिवसांत पूर्ण करेल असा तज्ञांना विश्वास आहे.
मान्सून नंतरचा प्रवास मात्र मंदगतीने होऊ शकतो. अल निनो परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोसमी पावसात हा अडथळा ठरू शकतो. केरळात मान्सून धडकण्यासाठी यंदा तीन दिवसांचा विलंब लागेल. म्हणजे 1 ऐवजी 4 जूनला धडकेल, तर महाराष्ट्रात 7 ऐवजी 11 जूनला मान्सून येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.