Sunday, September 8, 2024
Homeजिल्हामहाविद्यालय प्रवेशाकरिता जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य का ? – आमदार कॉ. विनोद...

महाविद्यालय प्रवेशाकरिता जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य का ? – आमदार कॉ. विनोद निकोले

मुंबई : महाविद्यालय प्रवेशाकरिता जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य का ? असा संतप्त सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी उपस्थित केला आहे. सदरहू विषयावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना ई-मेल द्वारे आ. निकोले यांनी निवेदन पाठविले आहे.

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षात सर्वच नियोजन विस्कळीत झाले आहे. त्याचा विपरीत असा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झालेला आहे. महामारीनंतर नुकतेच राज्यात सर्वत्र शाळा – महाविद्यालये सुरु झाली आहेत. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेशाला सुरुवात झालेली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालये विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश घेतानाच दाखल करण्याचे सांगत आहे. परंतु महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना ही सर्व कागदपत्रे स्वतःकडे एकत्र करता आलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणीमुळे हजारो विद्यार्थी जे जात वैधता प्रमाणपत्र काढू शकलेले नाहीत. ते यंदाच्या प्रवेशापासून वंचित राहतील. 

त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र महाविद्यालयात दाखल करण्यासाठी किमान 6 महिन्याचा कालावधी देणे आवश्यक आहे. किंवा विद्यार्थ्यांचे प्रवेश स्वीकारून जात वैधता प्रमाणपत्र महाविद्यालयात दाखल करण्यासाठी ठराविक कालावधी अपेक्षित आहे. याबाबत सहानुभूतीने व गांभीर्याने विचार करून विद्यार्थी हितासाठी निर्णय घ्यावा असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी निवेदनाद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्या कडे मागणी केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय