आखाती देशांनी जगाला अडचणीत आणलाय
नवी दिल्ली : देशात इंधनदरात मोठी वाढ होण्याची शक्यता आर्थिक तज्ज्ञ आणि अभ्यासकांनी वर्तविली असून, महागाईत आणि मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत़ यामुळे सर्वसामान्य जनतेचे चांगलेच हाल होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे़ पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या सातत्याने वाढत असलेल्या किंमतीमुळे सरकारविरोधात असंतोषाची लाट पसरत आहे.
भारतात अखेर पेट्रोलने शंभरी गाठली आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक गणित बिघडलेले असताना पेट्रोच्या सातत्याने होणा-या दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यात आता पेट्रोलचे दर फक्त १०० वरच न थांबता अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण ओपेक (ऑर्गनाइजेशन पेट्रोलियम एक्सपोर्टींग कन्ट्री) या कच्च्या तेलाच्या पुरवठादार देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवायला तूर्तास तरी स्पष्ट नकार दिला आहे. ब्लूमबर्गने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ६५ डॉलर प्रति बॅरलच्याही वर गेल्या आहेत. त्या किंमती कच्च्या तेलाच्या कमी पुरवठ्यामुळे अजूनच वाढण्याची आता शक्यता आहे. त्यामुळे सामान्यांना पेट्रोल दराच्या भडक्याची मानसिक तयारी करूनच ठेवावी लागणार आहे.
सामान्यपणे जगाची कच्च्या तेलाची गरज भागवण्यासाठी आणि किंमती स्थिर ठेवण्यासाठी जवळपास १५ लाख बॅरल प्रतिदिन कच्च्या तेलाच्या उत्पादनाची आवश्यकता असते. मात्र, कोरोनाचा प्रभाव आणि जागतिक पातळीवरची आर्थिक स्थिती पाहाता ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे १० लाख बॅरल प्रतिदिन इतकेच उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये रशिया आणि कझाकिस्तान यांना सूट देण्यात आली आहे. ओपकेच्या नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये उत्पादन वाढवण्यावर एकमत होऊ शकलेले नाही.
१ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बैठक
आता पुढची बैठक १ एप्रिल रोजी होणार आहे. तेव्हा जर उत्पादन वाढले, तरच आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा कमी असल्यामुळे त्यातून तयार होणा-या पेट्रोलचा पुरवठा देखील कमी होत आहे. त्याचाच परिणाम अंतिमत: पेट्रोलच्या किंमती वाढण्यात होतो.
काय आहे ओपेक?
ओपेक ही कच्च्या तेलाचे उत्पादन आणि पुरवठा करणा-या देशांची संघटना आहे. जगभरात या संघटनेच्या माध्यमातून कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. याच कच्च्या तेलाचा वापर करून पेट्रोल इंधनाची निर्मिती केली जाते. या संघटनेमध्ये प्रामुख्याने आखाती देश आहेत. यामध्ये संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, नायजेरिया, कुवैत, लिबिया, गबॉन, इराण, काँगो, व्हेनेझ्युएला, इराक, इक्वेडॉर, अल्जेरिया या देशांचा समावेश आहे. यासोबतच रशियामधून देखील काही प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो.