पुणे : कसबा (Kasba) पोटनिवडणूक वादातीत राहिली असून, वेगवेगळ्या आरोपांमुळे गालबोट देखील लागल्याचे दिसत आहे. पैसे वाटप तसेच कार्यकर्त्यांना दमदाटी आणि आचार संहितेचा भंग केल्याचे आरोप झाले आहेत. दरम्यान भाजपचे (Bjp) माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा (Crime) नोंद करण्यात आला आहे. तर, भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गणेश बिडकर, मयूर चव्हाण, नईम शेख, बाला शेख यांच्यावर अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवक काँग्रेस कॅन्टोन्मेंट विभागाचे माजी अध्यक्ष फैयाज कासम शेख (वय ३८, रा. २१६ मंगळवार पेठ, मालधक्का चौक) यांनी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गणेश बिडकर, मयूर चव्हाण, नईम शेख, बाला शेख यांच्यावर अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवक काँग्रेस कॅन्टोन्मेंट विभागाचे माजी अध्यक्ष फैयाज कासम शेख (वय ३८, रा. २१६ मंगळवार पेठ, मालधक्का चौक) यांनी तक्रार दिली आहे.
बिडकर व त्यांचे कार्यकर्ते रविवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील आएशा कॉम्प्लेक्समध्ये कार्यकर्त्यांसह आले होते. फैयाज शेख आणि त्यांचे मित्र याकूब बशीर शेख यांना माहिती मिळाली की भाजपचे कार्यकर्ते कॉम्प्लेक्समध्ये पैसे वाटप करत आहेत. त्यानंतर शेख तेथे गेले. तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हातात केशरी रंगाची पिशवी दिसून आली. पिशवीत मतदार स्लिप ठेवण्यात आल्या होत्या. पिशवीत पैसे असल्याचे शेख यांना समजले. त्यांनी बिडकर आणि कार्यकर्त्यांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी फैयाज आणि याकूब शेख यांना शिवीगाळ करुन धक्काबु्क्की केली, असे फैयाज शेख यांनी पोलिसांकडे दिलेल्या अदखलापात्र तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.
विश्रामबाग पोलिसांत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्यावरून अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. मतदानाच्या दिवशी रविवारी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने हे मतदान केंद्रात भाजपाचे चिन्ह असलेली मफलर गळ्यात घालून गेले होते. मफलर घालूनच त्यांनी मतदान केले. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी निवडणुक निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. मतदान केंद्राच्या १०० मीटर आत कोणतेही पक्ष चिन्ह घेऊन त्यांचा मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कृती करण्यास मज्जाव आहे. त्याचे उल्लंघन केल्याने हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुक प्रचार संपल्यानंतर देखील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करुन उपोषण केले होते. त्यातून आचारसंहिता भंग केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपाली ठोंबरे यांनी मतदान यंत्राचा फोटो व्हायरल करुन मतदान गोपनीयतेचा भंग केल्याने त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. याबाबत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी स्रेहा किसवे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांची दखल घेऊन कारवाई करण्यात येत आहे.
भाजपचे बिडकर अन् रासनेंवर अदखलपात्र गुन्हे दाखल, काय आहे प्रकरण? : जाणून घ्या सविस्तर
- Advertisement -