पुणे : राज्यातील प्राध्यापक पद भरती सुरु व्हावी या मागणीसाठी पुण्यातील उच्च व तंत्रशिक्षण संचालकांच्या कार्यालया समोर प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन संघटनेने बेमुदत धरणे आंदोलनाला सुरू आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे २७ जून रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्याचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या समवेत विविध संघटनांची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये राज्यातील रखडलेली अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक भरती तात्काळ सुरु करावी यासह इतर मागण्यांचे निवेदन दिले होते. यावेळी आठ दिवसांत प्राध्यापक पद भरतीबाबतचा शासन निर्णय निघेल असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले होते. मात्र, अद्याप त्याबाबतचा शासन निर्णय निघालेला नाही. त्यामुळे राज्यातील प्राध्यापक भरतीसाठी पात्र असणाऱ्या सेट- नेट व पीएच.डी.धारक उमेदवारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाल्याने आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे संघटनेचे राज्य समन्वयक प्रा. संजय साबळे यांनी “महाराष्ट्र जनभूमी”शी बोलताना सांगितले.
त्यामुळे राज्यातील सेट- नेट व पीएच.डी. पात्रताधारक दि. १९ जुलै, २०२१ पासून संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे व सहसंचालक, उच्च शिक्षण, विभागीय कार्यालय, नागपूर यांच्या कार्यालयासमोर मागण्या पूर्ण होई पर्यंत राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.
■ आंदोलनातील प्रमुख मागण्या :
● ३ नोव्हेंबर २०१८ च्या ४०% प्राध्यापक भरती आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून उर्वरित ६०% जागांची तरतूद या आर्थिक वर्षात करावी.
● प्राध्यापक भरती तात्काळ व विनाविलंब सुरु होण्यासाठी प्रचलित विषयनिहाय/विभागनिहाय आरक्षण धोरण कायम ठेवण्यात यावे.
● तासिका तत्त्व (C.H.B.) धोरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे.
● तासिका तत्त्वावरील कामाचा अनुभव कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट झाल्यानंतर ग्राह्य धरण्यात यावा.
● राज्यातील सर्व विनाअनुदानीत महाविद्यालयांना त्वरीत अनुदान देण्यात यावे.
अशा मागण्या या आंदोलनात करण्यात येत आहेत. या बेमुदत धरणे आंदोलनात संघटनेचे राज्य समन्वयक डॉ.किशोर खिलारे, प्रा.सौरभ पाटणकर, प्रा.संतोष भोसले, ज्ञानेश्वर सावळे, प्रा.प्रकाश नाईक यांनी सहभाग घेतला आहे.