Thursday, September 19, 2024
Homeशिक्षणएस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ संपन्न

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ संपन्न

हडपसर : शरद पवार हे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी देशाच्या निर्णय प्रक्रियेत देशाचा जबाबदार पालक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. शैक्षणिक, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील त्यांची कामगिरी चमकदार आहे. कृषी क्षेत्रातील नव्या अशा संशोधनाला शरद पवार चालना दिली. तसेच उत्तम संघटन कौशल्य, संगणकीकरणाला प्रोत्साहन, विविध क्षेत्रातील आवड, प्रचंड जनसंपर्क असलेले शरदरावजी पवारसाहेब हे काळाच्या पुढे जाणारे व्यक्तिमत्व आहे. असे विचार रयत शिक्षण संस्थेचे, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी शरदरावजी पवारसाहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कर्मवीर व्याख्यानमालेत उद्घाटक म्हणून व्यक्त केले.

साधना शैक्षणिक संकुलाच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख डॉ. सदानंद भोसले होते. ते म्हणाले की, शरद पवार हे सामासिक संस्कृतीचे सहृदयी यात्री आहेत. भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पवारसाहेब जोपासत आहेत. संविधानकेंद्री संस्कृती निर्माण करण्यासाठी सर्वधर्मसमभाव पवारसाहेब जोपासत आहेत, असे विचार डॉ. सदानंद भोसले यांनी मांडले. 

अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केले. या व्याख्यानाला प्राचार्य विजय शितोळे, प्राचार्य रोहिणी सुशीर, मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, मुख्याध्यापिका झीनत सय्यद, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागाने केले.

कार्यक्रमाचे आभार प्राचार्य सुजाता कालेकर यांनी मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नम्रता मेस्त्री यांनी केले. 


संबंधित लेख

लोकप्रिय