सुरगाणा (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यात पाच ते सात वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या ठिक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्याने भात उत्पादक शेतकरी धास्तावले आहे. शेतकऱ्यांची झोप उडाली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
काही ठिकाणी खळ्यात कापून रचून ठेवलेली उडवी प्लास्टिक, ताडपत्रीने झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली होती. तर भाताच्या आवणात कापून ठेवलेला भात पावसाच्या सरीत भिजल्याने हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला तर जाणार नाही ना अशी काळजी वाटत आहे. भात, नागली, वरई, उडीद, कुळीथ तसेच इतर पिकांची खूप नुकसान झाले आहे.
कोरोना काळानंतर महागाईला आधीच तोंड देता देता, आता हाताशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. पिंपळसोंड, पांगारणे, गोंदुणे, हडकाईचोंड, रघतविहीर, उंबरदे, पळसन, आमदा, वांगणसुळे, पायरपाडा, पातळी, पळशेत, खडकमाळ, काशिशेबा, धुरापाडा, माणी, सरमाळ, मनखेड, जाहूले, हस्ते, कळमणे, बाऱ्हे, ठाणगाव, बेडसे, आंबोडे, खोकरविहीर, खिर्डी, भाटी या भागात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
रब्बी हंगामातील कांदा रोपे, वालखड, लसून, गहू, हरभरा, वेल पापडी या पिकाची पेरणी सुरु असून जोरदार पाऊस झाल्यास हि पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.