भोसरी गावठाण येथे फुटपाथ मोठे व रस्ते छोटे करण्याचे चुकीचे काम गेले वर्षभर सुरु असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ऍड. सचिन गोडांबे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त, स्थापत्य विभाग, BRTS विभाग इ. ना निवेदन पाठविले आहे.
निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की भोसरीतील पुणे नाशिक हायवे वर कै. अंकुशराव लांडगे सभागृहापासून भोसरी सहल केंद्राच्या कडेने फुगे आळी, भोसरी गावठाण कडून आळंदी रोड कॉर्नर पर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्याचे काम गेल्या एका वर्षापेक्षा जास्त काळ अतिशय संथगतीने सुरु आहे ज्यामुळे हजारो नागरिकांना त्रास होत आहे. भोसरी सहल केंद्राच्या भिंतीच्या कडेने मोठा 7-8 फुटी फुटपाथ असताना पुन्हा त्याच्या विरुद्ध बाजूस गावठाणातील रहदारी वस्तीच्या बाजूने ही मोठा फुटपाथ बांधून जाण्यायेण्यासाठी रस्ता छोटा ठेवला जात आहे ज्यामुळे मोठा त्रास सुरु झाला असून वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या हि उद्भवली आहे.
भोसरी सहल केंद्राच्या भिंतीलगत 7-8 फुटी फुटपाथ असताना गावठाणातील रहिवासी भागाकडे पुन्हा मोठ्या फुटपाथची अजिबात गरज नाही. यामुळे तेथील नागरिकांना रस्त्यावर आपल्या गाड्या लावायला लागत आहेत व त्यामुळे रस्ता अजून कमी झाला आहे. त्यामुळे तातडीने प्लॅन मध्ये बदल करावा व भोसरी गावठाण मधील फुगे आळी ते धावडे आळी या 300 मीटर रहिवासी भागाकडे फुटपाथ न करता रोडच्या लेव्हलमध्ये सिमेंट ब्लॉक बसविल्यास येथे राहणाऱ्या नागरिकांना पार्किंगचा त्रास होणार नाही व रस्ताही मोठा राहील. राहिलेले काम लवकर पूर्ण करावे हि विनंती. तसेच भोसरी गावठाणातील फुगे आळी ते धावडे आळी दरम्यानचा जुना मोठा बंदिस्त नाला साफ ही साफ करण्यात यावा म्हणजे येथे चोकअप होणार नाही अशी मागणी सचिन गोडांबे यांनी केली आहे. 2008-09 दरम्यान या नाल्याच्या कामासाठी मी सतत पाठपुरावा केल्यावर पुण्यातील दोन आमदारांनी हा प्रश्न त्यावेळी विधानसभेत तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित केला होता व त्यानंतर मंत्रालयातील नगरविकास विभागाने पिंपरी पालिकेच्या बड्या अधिकाऱ्यांना तातडीने जागेवर भेट द्यायला लावून हा नाला मोठे पाईप बसवून बंदिस्त केला होता अशी माहिती सचिन गोडांबे यांनी दिली.


