नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक उद्या मंगळवारी (२२ जून) दिल्लीत होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
तसेच या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.
नवाब मलिक यांनी सांगितले की, “देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार आहेत तसेच, उद्या मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत.”
लोकसभेच्या आगामी अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा मतता बॅनर्जी, उपाध्यक्ष यशवंत सिन्हा, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, इत्यादी नेते चर्चेसाठी येणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर आज पुन्हा दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट सुटलं चर्चा होत आहे.