तळोदा, दि. २४ : मंजूर वनपट्टा धारक शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत पीककर्ज उपलब्ध करून द्यावे यासाठी राजेंद्र पाडवी बिरसा फायटर्स जिल्हाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार जिल्हयात ८ ते १० हजार मंजूर वनपट्टा धारक शेतकरी आहेत.७० ते ८० वर्षापासून आदिवासी शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी परंपरागत शेती करीत आहे.गेल्या ७-८ वर्षापासून वनपट्टे मंजूर झालेले आहे. परंतू, ७/१२ उतारा अजून दिला नसल्यामुळे बँक अधिकारी पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भावामुळे लोकांना रोजगारासाठी बाहेर जात आले नाही आणि वाढती महागाई यामुळे कुटूंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शेतकरी राजा चिंतेत आहे. आता पेरणीच्या हंगाम सुरू आहे.
शेतकऱ्यांकडे बी-बियाणे, खते, औषधे घेण्यासाठी पैसे नाही. मंजूर वनपट्टा धारक शेतकऱ्यांना तात्काळ एक लाखापर्यंत पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बिरसा फायटर्सने शासनाने केली आहे.