Wednesday, August 17, 2022
Homeकृषीकेंद्रीय गृहराज्यमंत्री यांना तत्काळ बडतर्फ करा, त्यांच्या मुलावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा...

केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना तत्काळ बडतर्फ करा, त्यांच्या मुलावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा – जुन्नरमधून मागणी

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर, ता.५ : उत्तर प्रदेश मधील लखीपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय किसान सभेने निषेध केला आहे. तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांना बडतर्फ करून दोषींवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करा, अशा मागणीचे निवेदन जुन्नर तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकऱ्यांना भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात आले असून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाने एका शेतकऱ्याला गोळ्या घालून मारल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले आहे. 

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करा व किफायतशीर आधार भावाचा केंद्रीय कायदा करा या प्रमुख मागण्यासाठी दिल्लीत दहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सभा स्थळाकडे जात असताना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र टेनी याने व त्याच्या गुंडांनी शेतकऱ्यांना शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकले.

भारतीय शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काळीकुट्ट घटना असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांना तातडीने बडतर्फ करा, त्यांचा मुलगा व त्याच्याबरोबर हल्ल्यात सामील असणाऱ्या सर्वांवर 302 कलमाखाली हत्येचा गुन्हा दाखल करा व सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा, आणि मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तसेच जखमी शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्या अशी मागणी किसान सभेने केली आहे.

निवेदन देतेवेळी पुणे जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष ऍड. नाथा शिंगाडे, उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, जुन्नर तालुका अध्यक्ष डॉ. मंगेश मांडवे, तालुका सचिव लक्ष्मण जोशी, आंबे पिंपरवाडी गावचे सरपंच, मुकुंद घोडे, गणपत घोडे, नारायण वायळ आदीसह उपस्थित होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय