Thursday, February 6, 2025

जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी कमळ हाती घेतल्यास राजकीय समीकरणे बदलणार !

जुन्नर / रफिक शेख : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे नुकत्याच एका कार्यक्रमात जाहीर केले आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाने जुन्नर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाची ताकद नक्कीच वाढू शकते.

जि.प.सदस्या आशाताई गेली तीस वर्षे राजकारणात सक्रिय असून, सलग चार वेळा जुन्नर तालुक्यात विविध मतदार संघातून जिल्हा परिषद सदस्या म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत. मागील लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  शिवसेना पक्षाने त्यांना ज्या पध्दतीने पक्षातून काढून टाकले होते. याबाबत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरूध्द एक सुप्त लाट तालुक्यात उसळली गेली आहे. आजही संपूर्ण जुन्नर तालुक्यात अनेक लहानमोठ्या गावांमधून पूर्वी शिवसेनेत असलेले निष्ठावंत कार्यकर्ते आशाताईंबरोबर असल्याचे निदर्शनास येत आहे. 

माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर आशाताईंनी एक मजबूत संघटन उभे करून तालुक्यातील कार्यकर्त्यांना ताकद व न्याय देण्यासाठी नेहमीच सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यामुळे आजही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नाळ त्यांच्याशी जुळलेली आहे. त्यामुळे त्यांच्या बरोबर अनेक कार्यकर्ते सुध्दा भाजपा मध्ये जाण्याची शक्यता आहे. 

जुन्नर तालुक्यात भाजपाचे संघटन पूर्वीच्या तुलनेत दिवसेंदिवस अधिक मजबूत होताना दिसत आहे. अनेक कार्यकर्ते इतर पक्षातील गटबाजीला कंटाळून भाजपा मध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे तालुक्यात भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आशाताईंच्या भाजपा प्रवेशाने जुन्नर तालुक्याबरोबरच संपूर्ण पुणे जिल्हयातील भारतीय जनता पक्षाची ताकद आगामी काळात नक्कीच आणखी वाढणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तसेच सहकारी संस्थांमधील निवडणुकांमध्ये ठिक ठिकाणी कमळ फुलल्याचे नक्कीच पहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles